पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 9 (सूस–बाणेर–बालेवाडी–पाषाण) ही लढत शहरातील सर्वाधिक चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा सामना ठरली. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर आणि भाजपमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अमोल बालवडकर यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेर मध्यरात्री उशिरा आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर विजयी झाले.
मतमोजणीत वारंवार आक्षेप, निकाल रखडला
या प्रभागात मतमोजणीदरम्यान दोन्ही बाजूंनी वारंवार आक्षेप घेतल्यामुळे प्रक्रिया अनेक वेळा थांबवण्यात आली. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाला आणि संपूर्ण शहराचं लक्ष प्रभाग 9 कडे लागलं होतं. अखेर 16 जानेवारी रोजी रात्री उशिरा निकाल जाहीर झाला.
राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल बालवडकर यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची बनली होती.
चंद्रकांत पाटलांचं भाकीत ठरलं फसवं
या लढतीला आणखी रंग चढला तो मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाकीतामुळे. प्रचारादरम्यान त्यांनी,“प्रभाग 9 मधून भाजपचे लहू बालवडकर हे महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होतील. डायरीत लिहून ठेवा,”असं जाहीर वक्तव्य केलं होतं.यावर अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी कधीच खरी ठरत नसल्याचा टोला लगावला होता. अखेर निकालानंतर पाटलांचं भाकीत खोटं ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
निष्ठावंत विरुद्ध बंडखोर अशी लढत
अमोल बालवडकर यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पॅनेलमध्ये गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे आणि पार्वती निम्हाण यांचा समावेश होता.दुसरीकडे भाजपकडून लहू बालवडकर, त्यांच्या पॅनेलमध्ये रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे होते.आयटी हब आणि मोठ्या निवासी सोसायट्यांनी व्यापलेल्या या प्रभागात विकास, रस्ते, पाणीपुरवठा आणि वाहतूक हे प्रमुख मुद्दे होते. मात्र प्रत्यक्षात ही लढत निष्ठावंत विरुद्ध बंडखोर अशीच रंगली आणि अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.