पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना अनेक प्रस्थापित नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विविध प्रभागांमधून उमेदवारी करणाऱ्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी स्पष्ट नकार दिल्याचं चित्र समोर आलं आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांचा दुहेरी पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या प्रभाग क्रमांक २५ आणि २६ मधून निवडणूक लढवत होत्या. मात्र दोन्ही प्रभागांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.मतमोजणीदरम्यान त्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत काही काळ मतमोजणी थांबवली होती. तरीही अखेर दोन्ही ठिकाणी पराभव स्वीकारावा लागल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
बंडू आंदेकरांचा दारुण पराभव
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू ऊर्फ सूर्यकांत आंदेकर यांचा प्रभाग क्रमांक २४ मधून दारुण पराभव झाला आहे.विशेष म्हणजे बंडू आंदेकरांना अवघी १५३ मते मिळाली आहेत.दरम्यान, त्यांच्या भावजयी लक्ष्मी आंदेकर आणि सुन सोनाली आंदेकर या प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झाल्या असून, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची अधिकृत उमेदवारी होती.
रविंद्र धंगेकरांच्या पत्नी व मुलालाही अपयश
शिवसेना नेते व माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि मुलगा प्रणव धंगेकर यांना उमेदवारी दिली होती.मात्र प्रतिभा धंगेकर यांचा प्रभाग २३ मधून तर प्रणव धंगेकर यांचा प्रभाग २४ मधून पराभव झाला आहे. एकाच निवडणुकीत पत्नी आणि मुलगा दोघांचाही पराभव झाल्याने धंगेकर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
वसंत मोरे व त्यांच्या मुलाचाही पराभव
मनसेतून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे यांनाही या निवडणुकीत अपयश आलं आहे.वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा दोघेही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत होते. मात्र दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला आहे.
पुण्यात मतदारांचा स्पष्ट संदेश
या निकालांमधून पुण्यातील मतदारांनी अनेक प्रस्थापित नेते, कुटुंबीय राजकारण आणि दबंग प्रतिमेला स्पष्ट नकार दिल्याचं चित्र दिसून येत आहे. येत्या काळात या निकालांचा पुण्याच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.