सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 शहर

पुण्यात पुन्हा दूषित पाण्याचा कहर; पिण्याचे पाणी की आजारांचे आमंत्रण? महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे कर्वेनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात

डिजिटल पुणे    19-01-2026 12:55:19

पुणे : पुण्यातील कर्वेनगर परिसरात मैलमिश्रित व दूषित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळ परिसरात मुख्य जलवाहिनीतून घाणेरडे व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाल्याची घटना समोर आली असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रविवारी (दि. १८) सकाळी पाणीपुरवठा सुरू होताच अनेक घरांतील नळांमधून काळसर, घाण वास येणारे आणि मैल्याचे अंश असलेले पाणी आले. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी

या प्रकारामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी केली आहे. पाणीपुरवठा विभागाने त्वरित पाहणी करून दूषित पाणीपुरवठा थांबवावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

नगरसेविकांची पाहणी, तात्पुरती व्यवस्था

नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा बराटे यांनी गायकवाड चाळ परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून दिले आहेत.

दुरुस्ती काम सुरू, टँकरद्वारे पाणीपुरवठा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनीची पाहणी करण्यात आली असून, ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून गेलेले काही जुने व गंजलेले नळजोड आढळून आले आहेत. हे नळजोड बंद करण्यात आले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १९) सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मैलमिश्रित पाणी कसे प्रवेश करते याची खात्री करून पुढील उपाययोजना केल्या जातील. तोपर्यंत नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.


 Give Feedback



 जाहिराती