मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजप आणि शिंदे सेनेतील तणाव आता एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महत्त्वाच्या महानगरपालिकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद देण्याची एकनाथ शिंदे यांची मागणी भाजपने फेटाळल्यानंतर, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये भाजपला अडचणीत आणण्याची रणनीती शिंदे गटाकडून आखली जात असल्याची चर्चा आहे.
एमएमआरडीए क्षेत्रातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने शिंदे सेनेपेक्षा चांगली कामगिरी केली असली, तरी ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना राजकीय शह देण्यासाठी शिंदे गट आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवलीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 122 नगरसेवक असून, शिंदे गटाचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणूक युतीत लढवूनही महापौरपद आणि महत्त्वाची पदे भाजपला देण्यास शिंदे गट अनिच्छुक असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी इतर पक्षांच्या नगरसेवकांशी संपर्क वाढवल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या एका नगरसेवकाने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
उल्हासनगरमध्ये वंचित आघाडीसोबत युतीची शक्यता
उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपचे 37 तर शिंदे गटाचे 36 नगरसेवक आहेत. येथे वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंब्याचे पत्र दिल्याने सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंबरनाथप्रमाणेच उल्हासनगरमध्येही भाजपला डावलत शिंदे गट सत्तास्थापन करू शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
ठाण्यातही महापौरपदावरून रस्सीखेच
ठाणे महानगरपालिकेत शिंदे सेनेने 75 जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले असून भाजपला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागले आहे. बहुमत स्पष्ट असतानाही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी पक्षश्रेष्ठांकडे केली आहे. त्यामुळे मुंबईनंतर आता ठाण्यातही महापौरपदावरून भाजप आणि शिंदे सेनेत संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.