पुणे : राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी (शरद पवार गट आणि अजित पवार गट) संयुक्तपणे एक विशेष रणनीती आखली असून, परिस्थितीनुसार ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या दोन्ही निवडणूक चिन्हांचा वापर करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जे चिन्ह फायदेशीर ठरेल, त्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक, रणनीतीवर शिक्कामोर्तब
महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बैठक घेत जिल्हा परिषद निवडणुकांची रणनीती निश्चित केली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे. विशेष बाब म्हणजे या उमेदवारांची जबाबदारी ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हांवरील उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राष्ट्रवादीचे उमेदवार या दोन्ही चिन्हांवर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मतविभाजन टाळण्यावर भर
महापालिका निवडणुकांमध्ये झालेल्या दयनीय कामगिरीनंतर मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी ‘घड्याळ’ या चिन्हावर एकमताने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे. एकत्रित लढा दिल्यास निवडणुकीत फायदा होईल, अशी भूमिका शरद पवार गटाकडून मांडण्यात आली आहे.
दरम्यान, 16 जानेवारीपासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये निवडणूक समीकरणे जुळवण्याला वेग आला आहे. पवार काका–पुतण्याने आखलेली ही नवी रणनीती दोन्ही राष्ट्रवादीसाठी कितपत फायदेशीर ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.