सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अपघात रोखण्यासाठी ‘पीटीझेड ‘ कॅमेरे,नवले पुलाजवळ बसविले,वेगावर नियंत्रण राहणार
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
 राजकारण

शिवसेना नाव आणि चिन्हावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास काय? असिम सरोदेंचं मोठं विधान

डिजिटल पुणे    20-01-2026 12:37:27

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षनाव व निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्या (21 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. 2022 मध्ये झालेल्या राजकीय फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला दिला होता. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ही याचिका प्रलंबित असून उद्याच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अलीकडे झालेल्या नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे गटाने शिवसेना व धनुष्यबाण चिन्हावर, तर उद्धव ठाकरे गटाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ व मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या.

दरम्यान, या प्रकरणावर ज्येष्ठ वकील अ‍ॅड. असिम सरोदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरील प्रकरणाची सुनावणी उद्या असली, तरी 37 क्रमांकाचं प्रकरण प्रत्यक्ष सुनावणीस येणं कठीण आहे. मात्र जर एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि चिन्ह काढून घेतलं गेलं, तर त्याचे मोठे राजकीय परिणाम होतील.”

असिम सरोदे यांच्या मते, अशा परिस्थितीत शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं. तसेच शिंदे गटातील अनेक नेते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतू शकतात, ज्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होईल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिकेचं राजकारण बदलू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

“सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला हा राजकीय खेळ, शेवटी सर्वोच्च न्यायालयातच संपेल,” असंही असिम सरोदे यांनी नमूद केलं आहे.उद्याच्या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो, यावर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका राजकारणाची दिशा ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.


 Give Feedback



 जाहिराती