मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च २०२६ दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज असल्याचे मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांनी कळविले आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळामार्फत सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत. परीक्षेकरिता दक्षता समिती गठीत करण्यात आली असून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा कशी द्यावी तसेच परीक्षा देताना काय करावे आणि काय करू नये, याबाबतही सूचना देण्यात आल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.