पुणे : नऱ्हेगाव परिसरातील गंभीर पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात ₹२ कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी ठोस मागणी नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे लेखी निवेदन देत पाठपुरावा केला आहे.
नऱ्हेगाव हा परिसर पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेला असून, गेल्या काही वर्षांत येथे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. शैक्षणिक संस्था, औद्योगिक केंद्रे तसेच वाढती निवासी वसाहत यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नियमित पाणीपुरवठा न होणे, कमी दाबाने पाणी येणे, अनियमित वेळापत्रक तसेच काही भागांत टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ येत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगरसेवक हरिदास चरवड यांनी पुढील उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी केली आहे.

नवीन पाईपलाईन विकसित करणे व मुख्य जलवाहिनी टाकणे
आवश्यक ठिकाणी पंपिंग स्टेशन विकसित करणे व क्षमतेत वाढ करणे
जुन्या व नादुरुस्त पाईपलाईन बदलणे आणि दाब वाढवण्यासाठी सुधारणा करणे
संबंधित भागातील पाणी वितरण व्यवस्था अधिक मजबूत करणे
या सर्व कामांसाठी पुणे महानगरपालिकेच्या २०२६–२७ च्या अंदाजपत्रकात ₹२ कोटी (दोन कोटी रुपये) इतक्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल व अंदाजपत्रक तयार करून तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.नऱ्हेगाव परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून या लोकहिताच्या विषयावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक हरिदास चरवड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
