नागपूर : नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोधणी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. प्राची खापेकर असे मृत तरुणीचे नाव असून, शेखर ढोरे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विवाहित असून तो प्राचीचा शेजारी होता.
प्राची खापेकर ही गोधणी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत कुटुंबासह राहत होती. ती बी.ए.चे शिक्षण घेत होती. याच दरम्यान आरोपी शेखर ढोरे याच्या पत्नीबरोबर ती शिवणकाम करत होती. या ओळखीचा गैरफायदा घेत शेखरने प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हेतू लक्षात येताच प्राचीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती.
घरात कोणी नसताना घडली घटना
मंगळवारी सकाळी प्राचीच्या घरात कोणीही नसताना शेखर तिच्या घरी गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर गंभीर प्रकारात झाले आणि रागाच्या भरात शेखरने प्राचीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने आत्महत्येचा बनाव रचून घटनास्थळावरून पलायन केले.
सुरुवातीला आत्महत्येचा संशय
काही वेळाने प्राचीचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ मानकापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीला अटक, कबुली
यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत संशयित शेखर ढोरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने मानकापूर आणि गोधणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.