सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 राजकारण

पिंपरी-चिंचवड महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव; मंत्रालयातील सोडतीत शिक्कामोर्तब

डिजिटल पुणे    22-01-2026 15:02:30

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी (२०२६ ते २०२८) महापौरपदाचे आरक्षण आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील मंत्रालयात पार पडलेल्या सोडतीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापौरपद खुल्या महिला प्रवर्गात गेल्यामुळे आता पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर महिला नगरसेविका आणि इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाली वाढल्या असून, सत्ताधारी भाजपमध्ये महापौरपदासाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपला स्पष्ट बहुमत, महिला महापौर निश्चित

१५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ भाजपच्या गळ्यात पडणे निश्चित मानले जात असून, कोणत्या महिला नगरसेविकेची निवड होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण १२८ जागा):

भाजप : ८४

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ३७

शिवसेना (शिंदे गट) : ०६

अपक्ष : ०१

भाजपच्या महिला उमेदवारांची दमदार कामगिरी

या निवडणुकीत भाजपच्या तब्बल ७ महिला उमेदवारांनी १० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील सारिका गायकवाड यांनी सर्वाधिक १६,०११ मतांच्या फरकाने विजय मिळवत शहरात लक्ष वेधले. याशिवाय स्नेहा कलाटे, रेश्मा भुजबळ आणि श्रुती डोळस या महिला नगरसेविकांचाही उल्लेखनीय विजय झाला आहे. त्यामुळे भाजप संघटन कौशल्य, शैक्षणिक पात्रता आणि प्रशासकीय अनुभव या निकषांवर महापौरपदाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

पुढील प्रक्रिया काय?

आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे—

नोटीस जारी : विभागीय आयुक्तांकडून महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल.

अर्ज दाखल : इच्छुक महिला नगरसेविकांना महापौरपदासाठी अर्ज दाखल करावे लागतील.

विशेष सभा : साधारणपणे पुढील १५ दिवसांत विशेष सभा घेऊन महापौरांची अधिकृत निवड केली जाईल.

‘दादां’चा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात

पिंपरी-चिंचवड निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यांनी स्वतः पंधरा दिवस मतदारसंघात तळ ठोकत मेट्रो प्रकल्प, मोफत बस सेवा यांसारखी आश्वासने दिली होती. मात्र, मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल देत ‘पिंपरीत दादांऐवजी कमळ’ हे चित्र ठळक केले. राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ जागांवर समाधान मानावे लागले, तर सत्ता स्थापनेसाठी हा आकडा अपुरा ठरला.महापौरपद महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आता पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होणार, हे निश्चित मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती