गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात आलापल्ली परिसरात घडलेल्या आरडी एजंटच्या हत्येचा थरारक उलगडा अहेरी पोलिसांनी केला आहे. ही हत्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीने नव्हे, तर सोन्याच्या चैनसाठी मित्रानेच मित्राचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
आलापल्ली येथील पतसंस्थेत अभिकर्ता म्हणून कार्यरत असलेले रवींद्र नामदेवराव तंगडपल्लीवार (वय 49, रा. नागेपल्ली) हे 18 जानेवारी रोजी सकाळी घरातून बाहेर पडले होते. मात्र ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. दुसऱ्या दिवशी आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील नागमाता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
सोन्याच्या चैनसाठी कट
पोलिस तपासात आरोपी समय्या मलय्या सुंकरी (वय 35, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याने दारूच्या व्यसनासाठी पैशांची गरज असल्याने रवींद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लुटण्याचा कट आखल्याचे समोर आले. आरडी काढायची आहे, असे सांगून त्याने रवींद्र यांना फोन करून निर्जनस्थळी बोलावले.
मद्यप्राशनानंतर हल्ला
दोघांनी मद्यप्राशन केल्यानंतर संधी साधत आरोपीने रवींद्र यांच्यावर सत्तूरने हल्ला केला. प्रतिकार करूनही आरोपीने वार सुरूच ठेवल्याने रवींद्र यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी अटकेत
हत्या करून सोन्याची चैन घेऊन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तिसऱ्या दिवशी अटक केली. न्यायालयाने त्याला 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षल एकरे करीत आहेत.