छत्रपती संभाजीनगर : शहरात एका तरुणीची फसवणूक करून तिचं आयुष्य उध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाचं नपुंसकत्व लपवून कुटुंबीयांनी थाटामाटात विवाह लावून दिल्याचा गंभीर आरोप पीडित विवाहितेने केला आहे. लग्नानंतर पतीने शरीरसंबंध टाळण्यासाठी ‘नवस केला आहे’ असं खोटं कारण पुढे करत मानसिक छळ केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.या प्रकरणात सासरच्या मंडळींनी नाशिकमध्ये फ्लॅट खरेदीसाठी 15 लाख रुपयांची मागणी करत छळ केल्याचा आरोप असून, छावणी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या एकूण 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नानंतर उघड झालं धक्कादायक वास्तव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडित महिलेचा विवाह 20 मे 2025 रोजी झाला. विवाहानंतर पतीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत नवसाचं कारण सांगितलं. संशय बळावल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी आग्रह धरला असता, तिला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात पती नपुंसक असून ही बाब लग्नाआधीच सासरच्या मंडळींना माहित होती, तरीही ती लपवून विवाह लावण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे.
15 लाखांच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ
पीडितेच्या तक्रारीनुसार, सासरच्यांनी नाशिकमधील खुटवडनगर परिसरात फ्लॅट घेण्यासाठी 15 लाख रुपये मागितले. पैसे येईपर्यंत शरीरसंबंध होणार नाहीत, असा दबाव टाकण्यात आला. याच काळात तिचे सोन्याचे दागिने आणि शैक्षणिक कागदपत्रे बळजबरीने काढून घेतल्याचाही आरोप आहे.
पतीच्या समलैंगिक संबंधांचा आरोप
तक्रारीत पतीचे जवळच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. 6 सप्टेंबर 2025 रोजी अत्यंत क्रूरपणे मारहाण झाल्याचं पीडितेने सांगितलं. सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून अखेर तिने पोलिसांत धाव घेतली.
पीडितेच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी पती, सासू, दीर, जाऊ, नणंद यांच्यासह एकूण 10 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 20 मे 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत हा छळ सुरू होता. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.