सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 शहर

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांचे १६ महिन्यांपासून पगार थकले; बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

डिजिटल पुणे    23-01-2026 17:28:27

पुणे : पुणे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल १६ महिन्यांपासून वेतन थकले असून, याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा थेट परिणाम शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजावर होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्मचारी संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून संस्थेतील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित पगार मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संस्थेच्या प्रशासनाकडून पगाराबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढला असून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे.

दरम्यान, अनुभवी शिक्षक नोकरी सोडून जात असल्याने त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नेमणूक केली जात आहे. मात्र, त्यांनाही वेळेवर वेतन मिळत नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आंदोलनामुळे अध्यापनासह प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून प्रात्यक्षिके, अंतर्गत परीक्षा आणि इतर शैक्षणिक उपक्रमांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.कर्मचारी संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला असून, तात्काळ थकीत पगार अदा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्यावर्षी संस्थेचे कार्यालय सील

दरम्यान, गेल्यावर्षी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या वडगाव बुद्रुक येथील ४३ आणि कोंढवा येथील ६ मिळकतींच्या कर थकबाकीपोटी महापालिकेच्या मिळकत कर विभागाने संस्थेचे वडगाव येथील कार्यालय सील केले होते. संस्थेच्या शहरातील एकूण १२८ मिळकतींवर तब्बल ३४५.४३ कोटी रुपयांचा मिळकत कर थकबाकी असल्याची माहिती समोर आली होती.

एरंडवणा येथील संस्थेचे मुख्य कार्यालयही ४७.४३ कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी महापालिकेने सील केले होते. मिळकत करासंदर्भात महापालिका आणि संस्था यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असून, या आर्थिक अडचणींचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे.


 Give Feedback



 जाहिराती