पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची घटना धक्कादायक आहे. एक कार्यकर्ता म्हणून दादांच्या नेतृत्वात २४ वर्षे काम करण्याची मला संधी मिळाली. दादांच्या कार्यतत्पर, रोखठोक व्यक्तिमत्त्वातून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जनतेच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली.
पुढे काही कारणास्तव आमच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या, मात्र तरीही सार्वजनिक जीवनात मला त्यांच्याकडून नेहमीच सन्मानाची वागणूक मिळाली. अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा मोठेपणा माझ्या मनाला भावणारा होता. चांदा ते बांदा महाराष्ट्र पाठ असणारे, शेतात पिकणाऱ्या पिकापासून ते शहरातील उंच टॉवर्समध्ये चालणाऱ्या उद्योगांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास असणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय परिघात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे. या कठीण प्रसंगी माझ्यासह संपूर्ण काँग्रेस पक्ष हा पवार कुटुंबीयांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.