बारामती : असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला.राज्याच्या राजकारणात गेल्या साडे चार दशकांपासून झंझावात निर्माण केलेल्या..आपल्या रोखठोक शैलीने अनेकांना चकित करून सोडलेल्या.. कामाचा माणूस म्हणून अखेरच्या श्वासापर्यंत ठेवलेली प्रतिमा.. ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेली नाळ...स्वत:साठी राजकीय विद्यापीठ करून घेतानाच दिलेला शब्द मोडायचा नाही, आपण कामाचा माणूस आहे हे तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये आज (29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. विमान लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. बारामतीत आज (29 जानेवारी) त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भावनिक वातावरणात त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला.
विद्या प्रतिष्ठानच्या आवारात सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या जनसमुदायाच्या डोळ्यांत अश्रू होते, तर मन सुन्न झालेलं दिसत होतं. “दादा अमर रहे”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
अंत्यदर्शनानंतरही नागरिकांचा पाय निघेना. गर्दी वाढत गेल्याने पोलिसांना परिस्थिती सांभाळण्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवावा लागला. नागरिकांना मागील गेटने बाहेर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गेल्या २० तासांपासून पोलीस प्रशासन गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न करत होते.या भावनिक क्षणी पार्थ आणि जय पवार यांनी हात जोडून उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केलं. लोकांच्या भावना लक्षात घेता त्यांनी संयम ठेवण्याचं आवाहन केलं. उपस्थितांनीही शिस्त पाळत पोलिसांना सहकार्य केलं.
अजित पवार यांचा दिलखुलास स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, कामाची शिस्त आणि प्रशासनावरची पकड यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये कायम लोकप्रिय राहिले. त्यांच्या अकस्मात जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.दादांच्या जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत असून, त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.