सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

मोठी बातमी : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा मोठा खुलासा;“साहेबांच्या हयातीतच राष्ट्रवादी एकत्र आणण्याची दादांची तीव्र इच्छा होती”

डिजिटल पुणे    31-01-2026 13:15:39

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यावी ही तीव्र इच्छा होती, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे.

“साहेबांच्या उपस्थितीतच पक्ष एकत्र व्हावा, ही दादांची इच्छा”

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या हयातीतच राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध व्हावी, अशी अजित पवार यांची मनोमन इच्छा होती. गेल्या सहा महिन्यांत याबाबत अनेक बैठका झाल्या असून, त्या चर्चांची जबाबदारी स्वतः शरद पवार यांनी आपल्यावर सोपवली होती, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

अनेक बैठका, सविस्तर चर्चा

जयंत पाटील यांच्या घरीच आठ ते दहा वेळा अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुरुवातीच्या बैठकींमध्ये अजित पवार आपल्या भावना मोकळेपणाने मांडत होते. “गेल्या काही वर्षांत जे काही घडलं ते मागे टाकून पुन्हा एकत्र यायचं,” असा त्यांचा ठाम विचार होता, असं पाटील म्हणाले.

12 फेब्रुवारीची तारीख जवळपास निश्चित

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत 12 फेब्रुवारी ही संभाव्य तारीख ठरवण्यात आली होती. जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अधिकृत घोषणा करण्याचा विचार होता. यासाठी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा झाल्याचाही उल्लेख जयंत पाटील यांनी केला.

सुप्रिया सुळेही चर्चेत सहभागी

या एकत्रीकरणाच्या चर्चांमध्ये काही बैठकींना खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असंही पाटील यांनी सांगितलं. अजित पवार यांनी आपल्या गटातील वरिष्ठ नेते – सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनाही याची कल्पना दिली होती, असा दावा त्यांनी केला.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी – अंतर्गत विषय

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांची संमती असल्याशिवाय असा शपथविधी होऊ शकत नाही. सध्या अजित पवार गटातील निर्णय हे प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि काही अंशी छगन भुजबळ घेत असल्याचं चित्र दिसत असल्याचंही त्यांनी सूचक वक्तव्य केलं.“अजित पवार उत्तम मुख्यमंत्री ठरले असते”जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या नेतृत्व क्षमतेचं कौतुक करताना म्हटलं की, ते मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्रासाठी प्रभावी काम केलं असतं. निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी करायची, यामध्ये त्यांचा हातखंडा होता.

“दादांचं स्वप्न पूर्ण व्हावं”

राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यावी, ही अजित पवारांची शेवटची इच्छा होती. आता ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी पुढाकार घेऊन दादांचं स्वप्न पूर्ण करावं, असं आवाहन जयंत पाटील यांनी शेवटी केलं.


 Give Feedback



 जाहिराती