सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

आई फाउंडेशनकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप व शिक्षण सहकार्याचा मानवतावादी संकल्प.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    31-01-2026 14:42:04

उरण : “ हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे — माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या हृदयस्पर्शी विचारांना कृतीत उतरवत, दिव्यांग बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आई फाउंडेशन या सामाजिक संस्थेने मानवतेचा जिवंत संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविला. समाजातील सर्वात वंचित घटक असलेल्या आदिवासी पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊवाटप करण्यात आले. विंधणे आदिवासी वाडी, पिरवाडी आदिवासी वाडी, कोप्रोली आदिवासी वाडी,येथील शाळांमधील लहानग्यांच्या चेहऱ्यावर खुललेले आनंदी हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले. हा केवळ खाऊवाटपाचा कार्यक्रम नव्हता, तर “तुम्ही एकटे नाही” हा विश्वास देणारा भावनिक आधार होता.

दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या अडचणींवर मात करत समाजासाठी उभे राहण्याचा घेतलेला हा निर्धार खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आई फाउंडेशन ही संस्था दिव्यांग बांधव तसेच आदिवासी व वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी मार्गदर्शन, सहकार्य आणि सामाजिक भान जागृत करण्याचे सातत्याने कार्य करत आहे.संस्थेने यापूर्वीही पूरग्रस्तांना मदत, उरणमधील गरजू दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,दिव्यांग बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. यावेळी खाऊवाटपासोबतच प्रत्येक वाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. संस्थेच्या प्रतिनिधींनी भावनिक शब्दांत सांगितले कि “दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि सेवाभावाची ओळख आहे. आम्ही मदत करत नाही, आम्ही नातं जोडतो.”

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिलेदार मदन पाटील (अध्यक्ष), राजेंद्र पाटील (उपाध्यक्ष), रणिता ठाकूर (सचिव), महेश पाटील (खजिनदार), सदस्य उमेश पाटील, संदेश राजगुरू, योगेश पाटील, नितीन सांगवीकर, राकेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच रामकृष्ण थळी (पिरवाडी आदिवासी वाडी ), कल्पेश ठाकूर (कोप्रोली वाडी), नरेश पाटील आणि रमण पंडित (विंधणे आदिवासी वाडी )या शिक्षकांचे सहकार्य लाभले.याशिवाय गणेश पाटील (अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ दादरपाडा) चंद्रकांत पाटील (सहव्यवस्थापक, एच.ओ.सी. कंपनी, रसायनी) यांचेही मोलाचे योगदान लाभले.हा कार्यक्रम समाजाला एक सुंदर संदेश देऊन गेला -मानवतेची खरी ओळख मदतीत नसून, समानतेच्या भावनेत आहे.आई फाउंडेशन पुढील काळातही शिक्षण, मार्गदर्शन व सामाजिक उन्नतीसाठी असेच उपक्रम राबवत राहणार आहे. असे मत संस्थेच्या प्रत्येक शिलेदारांनी व्यक्त केले.

 


 Give Feedback



 जाहिराती