सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

*पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’चा दिमाखदार प्रारंभ*

डिजिटल पुणे    31-01-2026 14:44:00

पुणे: इंदिरा युनिव्हर्सिटीचे स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’चा प्रारंभ  दि.३१ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ध्रुव सभागृह, इंदिरा युनिव्हर्स कॅम्पस, ताथवडे येथे सकाळी ११ वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन झाले.ज्येष्ठ नृत्य अभ्यासक श्यामहरी चक्र,शुभांगी बहुलीकर ,कथक गुरु अमला शेखर , इंदिरा युनिव्हर्सिटीच्या  स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे अधिष्ठाता आशुतोष मिसाळ हे उपस्थित होते.

फेस्टिव्हलच्या निमंत्रक रसिका गुमास्ते, समन्वयक सुवर्णा बाग तसेच संयोजन समिती सदस्य नेहा मुथियान, अस्मिता ठाकूर, शमा अधिकारी, वरदा वैशंपायन यांनी  स्वागत केले.सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असलेल्या नृत्यसादरीकरणांना प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी ३१ जानेवारी २०२६ रोजी शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकनृत्य आणि समकालीन अशा विविध नृत्यशैलींची बहारदार सादरीकरणे झाली.  तमल दास (कोलकाता ),एकलव्य आर्ट फोरम (डोंबिवली ),लायोम इंस्टिट्यूट (पुणे ) अशा संस्थातील  कलाकारांनी बहारदार नृत्ये सादर केली.

भारतीय नृत्यपरंपरेची समृद्धता आणि आधुनिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम या सादरीकरणांमधून अनुभवता आला. विविध राज्यांतील तसेच आंतरराष्ट्रीय कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यप्रकारांना रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात कथक, भरतनाट्यम, ओडिसी, समकालीन नृत्य तसेच लोकनृत्याच्या सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कलाकारांच्या सादरीकरणातील तंत्र, भाव, लय आणि सर्जनशीलता यामुळे सभागृहात नृत्यकलेचा उत्सव साजरा होत असल्याची अनुभूती मिळाली. वय, भाषा, प्रांत किंवा क्षमतेच्या कोणत्याही भेदभावाशिवाय नृत्य सर्वांना एकत्र आणते, हा विचार सादरीकरणांतून प्रभावीपणे व्यक्त झाला. विद्यार्थी, नृत्यसाधक, रसिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फेस्टिव्हलला भरभरून प्रतिसाद दिला.

दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पहिल्या सत्रात आणि सायंकाळी साडेचार ते रात्री ८ या वेळात दुसऱ्या सत्रात फेस्टिव्हलमधील विविध नृत्य सादरीकरणे सरदार नातू सभागृह (भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता ) येथे होतील. 'नृत्य आणि मानसिक स्वास्थ ' विषयावर चर्चासत्र होईल.हृषीकेश पवार ,कल्याणी काणे ,तन्वी हेगडे त्यात सहभागी होतील.हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

*इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल ते पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल*

रसिका गुमास्ते, नेहा मुथियान, अस्मिता ठाकूर, शमा अधिकारी यांनी गेली सात वर्षे इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हलचे पुण्यात यशस्वी आयोजन केले आहे. युवा पिढीला व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच विशेष मुलांना देखील नृत्य सादरीकरणाची संधी देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न या फेस्टिव्हलच्या माध्यमातून करण्यात आला आहे,असे यावेळी सांगण्यात आले. मागील वर्षीपासून हाच फेस्टिव्हल ‘पुणे इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’ या नावाने पुणेकरांच्या भेटीस येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होणाऱ्या या महोत्सवाचे ‘Dance Sans Division’ हे ब्रीद असून नृत्य सर्वांना कोणत्याही विभागणीशिवाय एकत्र आणते, हा त्यामागील मूलभूत विचार आहे.


 Give Feedback



 जाहिराती