मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज संध्याकाळी ५ वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. याआधी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाणार आहे.
पडद्यामागे तीन दिवसांत काय घडलं?
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला होता. पक्षाची सूत्रे पुन्हा पवार कुटुंबाकडे ठेवण्याबाबत कुटुंबांतर्गत चर्चा सुरू झाली. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर पक्षाची जबाबदारी कोणाकडे द्यायची यावर विचारमंथन सुरू झाले.
सुरुवातीला सुनेत्रा पवार यांनी सक्रिय राजकारणात येण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र पक्ष तुटू नये, अजित पवार यांचे राजकीय स्वप्न अपूर्ण राहू नये आणि त्यांनी उभारलेली संघटना हातातून जाऊ नये, या भूमिकेतून कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढली. अखेर जड अंतःकरणाने त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला.त्यामुळे आधी शपथविधी आणि नंतर विलीनीकरणाची चर्चा असा मार्ग कुटुंबाने स्वीकारला आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाला एकत्र ठेवत पुढील राजकीय निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे.
सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती राहणार?
अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थ खात्यासह महत्त्वाची खाती होती. मात्र आजच्या शपथविधीत सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सध्या त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) आणि क्रीडा विभाग ही खाती कायम राहतील, अशी माहिती आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज मात्र इतर कोणाचाही शपथविधी होणार नाही.