बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीतील विमान दुर्घटनेत झालेल्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली असून, त्यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भावनिक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
रोहित पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत बारामतीतील कार्यकर्त्यांना हृदयस्पर्शी आवाहन केले आहे. श्रद्धांजलीच्या बॅनरवर अजित पवार यांच्या नावापुढे “स्वर्गीय” हा शब्द वापरू नये, अशी त्यांनी हात जोडून विनंती केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात की, “बारामती म्हणजे आदरणीय साहेब आणि अजितदादा. आजवर शहरात अभिनंदनाचे मोठे बॅनर झळकायचे—कधी उपमुख्यमंत्रीपदी निवड तर कधी भावी मुख्यमंत्री असे ठळक उल्लेख असायचे. तो देखणा फोटो पाहून मन अभिमानाने भरून यायचं. पण आज चित्र वेगळं आहे. आनंदाऐवजी दुःखाचं मळभ आहे.”ते पुढे म्हणाले, “आज बारामतीत अभिनंदनाऐवजी श्रद्धांजलीचे फलक दिसत आहेत. मात्र अजितदादा आपल्यातून गेले नाहीत—ते त्यांच्या कामातून कायम आपल्यात राहतील. त्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ हा शब्द लावण्याचं धाडस माझ्यात नाही, तसं आपणही करू नये.”या भावनिक पोस्टनंतर कार्यकर्त्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी रोहित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.