मुंबई : राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राच्या कार्यक्षमतेत व उत्पादनक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने उद्योग संचालनालयामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सर्व उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी इंडस्ट्री अँड गव्हर्मेंट नेटवर्किंग फोर इंक्लुसिव्ह ट्रान्सफॉर्मेशन अँड एम्पॉवरमेंट (Industry and Government Networking for Inclusive Transformation and Empowerment (IGNITE-2026)) या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात आले.
विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकास कार्यालयात संपन्न झाली. यावेळी उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड, MSME विकास कार्यालयाचे संचालक मिलिंद बारापात्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मुंबई प्राधिकरण व कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ यांनी जिल्ह्यातील उद्योजकीय वातावरण अधिक बळकट करण्यासाठी इग्नाईट कार्यशाळेची भूमिका स्पष्ट केली. तसेच उद्योग विभागाचे निर्यात धोरण, डिस्ट्रिक्ट एज एक्स्पोर्ट हब आणि नवीन औद्योगिक धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली.
एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमांतर्गत मुंबई उपनगरासाठी जेम्स अॅण्ड ज्वेलरी तर मुंबई शहरासाठी लेदर या उत्पादनांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबई उपनगर जिल्हा निर्यात क्षेत्रात आघाडीवर असून, सेव्हन पॉईंट्स अजेंडा राबवून आगामी वर्षात निर्यातीमध्ये डबल डिजिट वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याच अनुषंगाने प्रस्तावित लेदर पार्क व जेम्स अॅण्ड ज्वेलरी क्लस्टरची माहितीही देण्यात आली.
निर्यात प्रोत्साहनासाठी उद्योग सहसंचालक कार्यालय व एस. के. सोमैया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार ODOP ब्रँडिंग, प्रमोशन, जनजागृती कार्यक्रम, उद्योग भेटी, संशोधन व विकास तसेच एक तालुका दहा निर्यातदार उपक्रमासाठी सहकार्यावर केंद्रित आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी प्रमुख उद्योगांचे मॅपिंग करण्यासाठी कॉन्सेप्ट नोट तयार करणार आहेत.
या कार्यशाळेस शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मुंबई उपनगराच्या सर्वांगीण विकासात निर्यात क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योजकांनी उद्योग विभागाच्या विविध योजना व धोरणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी उद्योग उपसंचालक श्रीमती पूनम दराडे यांनी निर्यात धोरणावर सादरीकरण केले. तसेच DGFT ची भूमिका व नवीन SCOMET धोरणाबाबत अजय कोरला, सेवा क्षेत्रातील निर्यात संधींबाबत SEPC चे विवेक बक्षी, ODOP निर्यात ट्रेंड्सवर FIEO च्या श्रीमती रिषू मिश्रा, तर मत्स्य उद्योगासाठी प्रशिक्षण व कर्ज योजनांबाबत MPEDA चे मंगेश गावडे यांनी माहिती दिली. याशिवाय NIA, EPCES व ABHINAV MANAGEMENT INSTITUTE च्या प्रतिनिधींनीही विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. MAITRI पोर्टलबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा कुंभार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस MSME विकास कार्यालय, मुंबई प्राधिकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी उद्योग अधिकारी दिग्विजय पोळ यांनी उपस्थित सर्व उद्योजक, निर्यातदार व सहभागी प्रतिनिधींचे आभार मानले.