बारामती – अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. विशेषतः प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी पुढाकार घेत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवार गटासोबत जाण्यास इच्छुक नसून भाजपसोबत सत्तेत राहण्यास प्राधान्य देत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पक्षात अंतर्गत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच अजित पवार यांच्यानंतर योग्य व्यक्तीची निवड करणे आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तरीदेखील त्यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा कायम होती.
बुधवारी बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. “सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी घाईघाईने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली का?” असा प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी थेट उत्तर देणे टाळले.
“मला त्यावर भाष्य करायचे नाही,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, “सध्या आमच्यासमोरील आव्हान मोठे आहे. परस्परांना आधार देत पुन्हा उभे राहणे हे आमचे प्राधान्य आहे. राजकीय निर्णयांवर सध्या चर्चा सुरू नाही.”सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत ते म्हणाले, “त्यांना संधी मिळाली याचा आनंद आहे.”