मुंबई: राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची दिलासादायक माहिती समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे रखडलेले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते आता पात्र महिलांच्या खात्यात एकत्र जमा करण्यात येणार आहेत. यामुळे पात्र लाभार्थींना थेट ४,५०० रुपये मिळणार असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. काही लाभार्थींनी याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित कार्यालयांमध्ये तक्रारी केल्या, तर काही ठिकाणी महिलांनी आंदोलनही केले.
या पार्श्वभूमीवर विभागाने प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. नियमांनुसार अर्जांची तपासणी सुरू असताना, राज्य सरकारने तीन महिन्यांचे थकीत हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर व डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत, त्यांना आता एकूण ४,५०० रुपये मिळतील. तर ज्या लाभार्थींना दोन महिन्यांचे पैसे आधीच मिळाले आहेत, त्यांना केवळ जानेवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.
मासिक मदत २,१०० रुपये होणार का?
विधानसभा निवडणुकीदरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनानुसार, भविष्यात लाडकी बहीण योजनेतील मासिक मदत १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो