पुणे: वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाइट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नाल्यात कोसळली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला होता; मात्र प्रसंगावधान राखलेल्या लष्करी अधिकाऱ्यामुळे त्याचा जीव वाचला.
सकाळी सुमारे दहा वाजता लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव हे त्या मार्गावरून जात असताना त्यांना पुलावर गर्दी दिसली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कार नाल्यात पडल्याचे दिसून आले. वाहनात हालचाल जाणवल्याने त्यांनी विलंब न करता नाल्यात उतरून मदतकार्य सुरू केले. कारमध्ये चालक बेशुद्ध अवस्थेत अडकलेला होता.
स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यादव यांनी गाडीची काच फोडून जखमी व्यक्तीला बाहेर काढले. चालकाच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याने त्यांनी प्राथमिक मदत देत रक्तस्त्राव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले. विशेष म्हणजे, वाहनात सुमारे दीड लाख रुपये रोख रक्कम होती; ती त्यांनी प्रामाणिकपणे जखमी चालकाला परत दिली. त्यानंतर टेम्पोच्या साह्याने चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. वानवडी बाजार पोलिस चौकीचे पीएसआय बाळासाहेब वाकडे यांनी सांगितले की, जखमी चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दरम्यान, क्रेनच्या मदतीने नाल्यातील कार बाहेर काढण्यात आली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती तसेच पुलावरील संरक्षक कठड्यांची अवस्था याचीही चौकशी केली जात आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांच्या धाडसाचे आणि माणुसकीचे कौतुक केले असून त्यांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.