पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाचे श्री. रवी लांडगे यांची महापौरपदी तर सौ. शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सभागृहात सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवड हे शहर केवळ लोकसंख्येने मोठे नसून नियोजनबद्ध विकास, सक्षम नागरी सुविधा आणि प्रशासनिक शिस्त यामुळे देशपातळीवर आदर्श शहर म्हणून ओळखले जाते. सभागृहातून घेतले जाणारे दूरदृष्टीपूर्ण निर्णय, लोकप्रतिनिधींची परिपक्व भूमिका आणि शहरहिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य यामुळेच हा सर्वांगीण विकास शक्य झाला आहे. नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर हीच सभागृहाची गरिमा जपत शहर विकासाला अधिक गती देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवत उद्योग, आयटी, शिक्षण, मेट्रो व विविध पायाभूत सुविधांचा समतोल साधणारे आधुनिक महानगर म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हा विकास कोणत्याही एका व्यक्तीचा परिणाम नसून सभागृहातील सामूहिक निर्णय प्रक्रियेचे फलित आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत आणि विरोध असला तरी विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सुमारे ३ वर्षे १० महिने २४ दिवस चाललेली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात येत असून, नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख, पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभार होईल. प्रत्येक नगरसेवकाला समान संधी मिळेल आणि पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अधिक वेगाने पुढे जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी भारतीय जनता पक्षावर दाखवलेला विश्वास हे नवे सभागृह निश्चितच सार्थ ठरवेल, असेही यावेळी सांगण्यात आले.