मालेगाव : महापालिकेतील महापौर निवडणूक पार पडल्यानंतर लगेचच मालेगाव महानगरपालिका भवनात धक्कादायक प्रकार घडला. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली घसरल्याने खळबळ उडाली. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लिफ्टमध्ये १८ जण अडकले होते
अपघाताच्या वेळी लिफ्टमध्ये १८ जण होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली येताना अचानक नियंत्रण सुटले; मात्र ती थेट तळमजल्यावर न जाता पहिल्या मजल्यावर अडकली. यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्व प्रवासी सुरक्षित राहिले.
बचावकार्य तत्काळ सुरू
माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग तोडून अडकलेल्या लोकांना एक-एक करून बाहेर काढण्यात आले. या घटनेदरम्यान महापालिकेत काही काळ गोंधळाचे वातावरण होते.
राजकीय नेते व पत्रकारही लिफ्टमध्ये
लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी, काही नगरसेवक आणि पाच पत्रकार उपस्थित होते. सर्वजण सुरक्षित बाहेर आल्याने प्रशासनासह राजकीय वर्तुळाने सुटकेचा निश्वास सोडला.
महापौरपदी शेख नसरीन बानो खालिद
दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाली. काँग्रेसच्या पाठिंब्याने हे सत्तासमीकरण आकाराला आले.महापौर निवडणूक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजप व एमआयएमने या प्रक्रियेत तटस्थ भूमिका घेतली.