कोल्हापूर : शहरातील गजबजलेल्या शाहू मिल चौकात रविवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला. भरधाव क्रेटा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला.प्राथमिक माहितीनुसार, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. धडकेनंतर क्रेटा कार रस्त्याच्या मध्यभागी उलटली, तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. धडकेत दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचा मृत्यू झाला.अपघातानंतर मोठी गर्दी जमली होती. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत उलटलेली कार बाजूला करून रस्ता मोकळा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.