पुणे : पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज होणारी निवडणूक बिनविरोध पार पडली. विरोधी पक्षांनी माघार घेतल्यामुळे भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
महापालिकेच्या सभागृहात आज सर्व १६५ नगरसेवक उपस्थित होते. मात्र, अलीकडेच झालेल्या काही नेत्यांच्या निधनामुळे निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती भाजपकडून करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी मंजुषा नागपुरे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.
महापौरपदी विराजमान होण्यापूर्वी मंजुषा नागपुरे यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हे पद म्हणजे सत्ता नव्हे, तर सेवा करण्याची संधी आहे. मी कोणतेही मोठे आश्वासन न देता प्रत्यक्ष कामावर भर देणार आहे.” तसेच त्यांनी आपल्या आई आणि सासूबाईंची आठवण काढत भावनिक भावना व्यक्त केल्या.
कोण आहेत मंजुषा नागपुरे?
मंजुषा नागपुरे या भाजपच्या अनुभवी नगरसेविका आहेत. सनसिटी–माणिकबाग (प्रभाग ३५) येथून त्या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांचा प्रभाग बिनविरोध ठरला होता. त्यांनी यापूर्वी स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर काम केले असून महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
उपमहापौरपदी परशुराम वाडेकर
भाजपने उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, मागील कार्यकाळात त्यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. आता हा पदभार परशुराम वाडेकर सांभाळणार आहेत.
पुणे महापालिकेतील पक्षनिहाय बलाबल
एकूण जागा : १६५
भाजप : ११९
शिवसेना : ०
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट : १
राष्ट्रवादी (शरद पवार गट) : ३
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : २७
काँग्रेस : १५
एमआयएम : ०
अपक्ष : ०