सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

‘ओटीएम २०२६’; महाराष्ट्र पर्यटन दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद ;आशियातील सर्वात मोठ्या ‘ओटीएम २०२६’ ट्रॅव्हल शो’मध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग

डिजिटल पुणे    10-02-2026 11:29:33

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२६’चे (ओटीएम) आयोजन करण्यात आले होते. जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनात ४० हून अधिक पर्यटन भागधारकांनी सहभाग घेतला. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे,महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते.  दालनामध्ये उपस्थित असलेल्या पर्यटन भागधारकांशी संवाद त्यांनी साधला.

राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटन दालनाद्वारे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध  करून देण्यात आली.

महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या युवा पर्यटन राजदूत नवेली देशमुख यांनीही ‘ओटीएम’ कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पर्यटन  दालनाला भेट देऊन दालनामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांशी संवाद साधला. तसेच नवेली देशमुख यांनी महाराष्ट्र पर्यटन दालनाला मिळणाऱ्या प्रतिसादाबाबत कौतुक केले.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “‘ओटीएम’मधील सहभागाने निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच जगाच्या नकाशावर पर्यटनासाठी महाराष्ट्र नवी उंची गाठेल असा विश्वास आहे. या माध्यमातून पर्यटनाला गती मिळून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘ओटीएम’ने पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी दिलेल्या या व्यासपीठाबाबत आयोजकांचे आभार मानतो.”

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, “महाराष्ट्र राज्याच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात सध्या पर्यटनाचा वाटा ७ ते ८ टक्के आहे. भविष्यात तो १५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाद्वारे राज्यभरात विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘आउटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट’ (ओटीएम). राज्यातील पर्यटन उत्पादनांच्या प्रसारासाठी हे एक प्रभावी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरले आहे. या कार्यक्रमाद्वारे भागधारकांना जगभरातील कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध झाली. या उपक्रमांमुळे येत्या काळात महाराष्ट्र पर्यटन क्षेत्रात जागतिक भरारी घेईल.”

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे म्हणाले की, “‘ओटीएम २०२६’ प्रदर्शन जागतिक पर्यटनाचे महाद्वार आहे. या प्रदर्शनाद्वारे पर्यटन व्यावसायिक क्षेत्राला नवे व्यासपीठ मिळाले आहे. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाच्या माध्यमातून राज्याचा सांस्कृतिक वारसा, गडकिल्ले, विविध पर्यटन स्थळे यांची नव्याने ओळख होईल. ‘ओटीएम’मधील सहभागामुळे निश्चितच महाराष्ट्रातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. शिवाय या माध्यमातून पर्यटनाला गती मिळण्याबरोबरच अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जगाच्या नकाशावर महाराष्ट्र पर्यटनासंबंधित नवी उंची गाठेल असा आम्हाला विश्वास आहे”.


 Give Feedback



 जाहिराती