मुंबई : बारामतीतील खासगी विमान अपघात आणि त्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर आज आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवा आणि संभ्रम दूर करताना “अजित पवार आता आपल्यात नाहीत; ते परत येणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, अपघातानंतर मृतदेहांची संख्या, ओळख आणि घटनाक्रमाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले. मात्र, घटनास्थळी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर हा अपघात वास्तव असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी अजित पवार यांचा स्वेटर आणि त्यांचे बंद पडलेले मनगटी घड्याळ पाहिल्याचेही सांगितले. त्या घड्याळात नऊ वाजलेले दिसत होते, जे अपघाताच्या वेळेशी जुळते, असे ते म्हणाले.
अपघाताचा अंदाजे कालावधी
रोहित पवार यांच्या माहितीनुसार, सकाळी 7:02 वाजता विमानाचा क्रू तयार झाला होता. 7:03 वाजता बारामतीतील हवामानाचा आढावा घेण्यात आला. साधारण 8:30 ते 8:45 दरम्यान अपघात घडला असावा. 9 वाजता अजित पवार गंभीर जखमी असल्याची बातमी आली आणि 9:45 वाजता त्यांच्या निधनाची माहिती समोर आली.
विमान दोन दिवस आधी सूरतला गेले होते
हेच विमान दोन दिवसांपूर्वी सूरतला जाऊन परत आले होते, असे त्यांनी सांगितले. विमानमालकाने सुरुवातीला खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा दावा केला होता. मात्र, ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजवरून हवामान गंभीर नव्हते, असे दिसत असल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यामुळे यांत्रिक बिघाडाची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच, विमान उड्डाणापूर्वी योग्य तपासणी झाली होती का? नियमित देखभाल करण्यात आली होती का? याची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.शेवटी, “आज अजित पवार शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते कायम आपल्यासोबत राहतील,” असे भावनिक आवाहन रोहित पवार यांनी केले.