मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज सादर करत अपघात नेमका कसा घडला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. हा अपघात नसून घातपात तर नव्हता ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार यांनी अपघाताच्या वेळीचे सीसीटीव्ही दृश्य दाखवत सांगितले की, धुक्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी असतानाही विमानाला लँडिंगची परवानगी कशी देण्यात आली? फुटेजमध्ये रनवेवर एक रेष दिसत असून त्यानंतर स्फोट झाल्याचे दिसते. ती रेष आग होती का, याचे उत्तर अजून मिळालेले नाही, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी विमान वाहतूक नियमांचा संदर्भ देत सांगितले की, डीजीसीएच्या नियमांनुसार ५ किलोमीटरपेक्षा कमी दृश्यमानता असल्यास विमानाचे टेकऑफ किंवा लँडिंग करू नये. मात्र सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बारामती भागात दृश्यमानता फक्त तीन किलोमीटर होती, असे एटीसीने सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, Arrow कंपनीच्या हँडलरने सकाळी सात वाजता दृश्यमानता योग्य असल्याचे कळवले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे चुकीची माहिती देण्यात आली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नियमांचे उल्लंघन झाल्यामुळेच हा अपघात घडला असून Arrow कंपनीला जबाबदार धरले पाहिजे, असा आरोप त्यांनी केला.
तसेच त्यांनी पायलटच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले. कमी दृश्यमानता असतानाही पायलटने उड्डाणाचा निर्णय का घेतला? त्याच्यावर कुणाचा दबाव होता का? की त्याने जाणूनबुजून धोका पत्करला? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे त्यांनी म्हटले.