पुणे: स्पॅम आणि ऑनलाइन फसवणूकीच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी एअरटेलने आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून ‘फ्रॉड अलर्ट’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी अत्याधुनिक सुविधा सुरु केली आहे. ‘फ्रॉड अलर्ट’ ही नाविन्यपूर्ण प्रणाली ग्राहकांच्या वन-टाइम पासवर्ड संबंधित बँक फसवणूकींपासून तत्काळ प्रभावीपणे संरक्षण देते. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने संशयास्पद व्यवहार ओळखते. फसवणूकीचे व्यवहार होण्याची शक्यता असल्यास ही प्रणाली तत्काळ ग्राहकांना संबंधित व्यवहाराबद्दल सूचित करते. त्यामुळे एअरटेलचे ग्राहक ऑनलाइन फसवणूकीच्या व्यवहारातून पूर्णपणे सुरक्षित झाले आहे.
घरात ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून येणारे पार्सल किंवा अन्नपदार्थांचे वितरण होण्याकरिता ग्राहकांच्या मोबाईलनंबरवर येणा-या ओटीपीची मागणी केली जाते. घरपोच होणारे वितरण स्विकारताना अनेकांची लगबग सुरु असते. सायबर भामटे लोकांची होणारी धावपळ लक्षात घेत त्याचा गैरफायदा घेतात. अनेकदा वस्तू वितरण करण्याच्या बहाण्याने किंवा तातडीची सेवा देण्याच्या नावाखाली हे सायबर भामटे ग्राहकांकडून ओटीपीची मागणी करतात. कामाच्या व्यापात अडकलेल्या ग्राहकाला संबंधित ओटीपी हा बँकेऐवजी वितरणसेवेशी संबंधित असल्याचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात हा ओटीपी ग्राहकांच्या बँकेतील व्यवहारांशी संबंधित गोपनीय ओटीपी असण्याची शक्यता असते. ग्राहकांकडून अनावधानाने दिलेला ओटीपी सायबर भामटे ऑनलाइन चोरीकरिता वापरुन ग्राहकांना लुबाडतात.
एअरटेलची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी यंत्रणा अशा संभाव्य धोक्यांना वेळीच ओळखते. ग्राहकांना तातडीने सावध करते. मोबाईलवर एखाद्या संशयास्पद कॉलदरम्यान बँकेचा ओटीपी संदेश आल्यास ही यंत्रणा सतर्क होते. मोबाईलवर आलेल्या संदेशातून फसवणूक होत असल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास आणून देते. फ्रॉड अलर्ट ही यंत्रणा ग्राहकांचा कॉल सुरु असला तरीही बँक व्यवहारासाठी ओटीपी स्विकारण्याचा धोका लक्षात आणून देण्यास मदत करते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी निर्णयक्षमता यांचा हा प्रभावी मेळ ग्राहकांना विचार करण्यासाठी, संबंधित फसवणूकीच्या घटनेची खातरजमा करण्यासाठी, स्वतःहूनच आपापली सुरक्षितता करण्यासाठी गरजेयुक्त वेळ उपलब्ध करुन देतो. परिणामी, ग्राहक ऑनलाइन चोरींच्या घटनांपासून सुरक्षित राहतात.
एअरटेलच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या प्रणालीबाबत एअरटेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शाश्वत शर्मा यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘एअरटेल हे सुरक्षित नेटवर्क असावे, हे आमचे ध्येय आहे. एअरटेल सुरक्षित ठेवण्याकरिता उपाययोजना शोधताना आम्हांला मोबाईलमधील वनटाइम पासवर्ड (ओटीपी)च्या माध्यमातून होणारा चोरीचा मार्ग लक्षात आला. डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ओटीपी महत्त्वाची भूमिका साकारत असले तरीही चोरीसाठीही ओटीपीचा गैरवापर होतो. यावर उपाययोजना म्हणून आम्ही तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचे ठरवले. एअरटेल नेटवर्कमध्ये या तंत्रज्ञानच्या मदतीने ग्राहक ऑनलाइन चोरींपासून सुरक्षित असल्याचे आम्हांला निश्चितच समाधान आहे.
आमच्या नव्याने विकसित आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या प्रणालीतून थेट नेटवर्क स्तरावर काम केले जाते. सायबर भामट्यांकडून फसवणूकीच्या हालचाली सुरु होताच ही यंत्रणा संभाव्य धोके ओळखते. वेळीच हस्तक्षेप करुन सायबर गुन्हे रोखते. सायबर फसवणूकीच्या घटना आटोक्यात आणण्यात ही प्रणाली अत्यंत अचूकतेने आणि प्रभावीपणे काम करत असल्याचे विविध चाचण्यांतून सिद्ध झाले आहे.’’
गेल्या दोन वर्षांत एअरटेलने ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वेळीच रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. यात स्पॅम-कॉल वॉर्निंग, धोकादायक लिंक्स ब्लॉक करणे यांसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालींचा समावेश होतो. या प्रयत्नांमुळे एअरटेल कंपनीला आपल्या नेटवर्क स्तरावरील फसवणूकीला आळा घालण्यास मोठ्या प्रमाणात यश आले आहे. मात्र सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या तरकीबीमुळे भामटे लोकांशी संवाद साधत त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. हा धोका लक्षात घेत ही नवी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. आपल्या ग्राहकांना डिजिटल फसवणूकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एअरटेलने उचलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.एअरटेलच्या हरियाणा येथील ग्राहकांना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नव्या प्रणालीची सुविधा अगोदरपासूनच उपलब्ध करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात एअरटेलच्या देशभरातील सर्व ग्राहकांना ही सुविधा पुरवली जाईल.