मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे असे ते म्हणाले.
३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे कित्येक तास महामार्ग विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.मंत्री सरनाईक म्हणाले, चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.
वाहनांच्या तांत्रिक तपासणीला वेग, पारदर्शकतेवर भर
राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या. विशेषतः फॉर्म 138/A अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष
महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे, या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचेही निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल
महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.