सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

ज्येष्ठ समाज सुधारक विनायक पानसरे यांचे निधन; आंबेडकरी चळवळीतील सक्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड.

गजानन मेनकुदळे    12-02-2026 14:27:18

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील रहिवासी, ज्येष्ठ समाजसेवक व  विनायक लक्ष्मण पानसरे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक, औद्योगिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

विनायक पानसरे यांनी आपल्या कार्यातून समाजातील वंचित, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम आयुष्यभर केले. कर्मवीर रिक्षा, ट्रक, टॅक्सी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास हातभार लावला. अनेक बेरोजगार तरुणांना वाहनचालक म्हणून प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले.

सांगली, सातारा, पुणे तसेच सोलापूर जिल्ह्यांत त्यांनी मोफत वाहनचालक प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि रोजगारनिर्मिती कार्यशाळांचे आयोजन केले. ‘स्वावलंबन हाच खरा विकास’ या भूमिकेतून त्यांनी युवकांना केवळ रोजगारच नाही, तर आत्मविश्वासही दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला.

पानसरे हे कर्मवीर रिक्षा, ट्रक, टॅक्सी संघटनेचे चेअरमन तसेच भीमाई औद्योगिक संस्थेचे चेअरमन होते. संघटनात्मक नेतृत्व, सामाजिक भान आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ही त्यांची वैशिष्ट्ये होती. समाजकार्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी ते सातत्याने कार्यरत होते. समाजातील अन्याय, शोषण व भेदभावाविरुद्ध ते ठामपणे उभे राहत. आंबेडकरी विचारांचा प्रसार व सामाजिक जागृतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना दिशा मिळाली.

दैनिक ‘पुढारी’साठी कार्यरत मिलिंद पानसरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पानसरे व विक्रांत पानसरे यांचे ते वडील होते.त्यांच्या जाण्याने एक कर्तृत्ववान, तळमळीचा आणि समाजाशी नाळ जुळलेला नेतृत्ववंत हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती