मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणांतर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ (एआय फॉर ॲग्री २०२६) ही परिषद २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या प्रवासात महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी एआय फॉर ॲग्री २०२६ ही जागतिक परिषद येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. एआय फॉर ॲग्री ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक (एडीबी), इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्सिटीट्यूट फॉर दी सेमी-अॅरिड ट्रापिक्स (आयसीआयएसएटी), भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी), एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. राज्यात जाहीर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ च्या अंमलबजावणीकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या एआय धोरणाच्या निर्मितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची प्रेरणा मिळाली. कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आदींसाठी एक व्यासपीठ म्हणून परिषदेचा उपयोग करून घेता येईल, असे त्यांनी सांगितले.महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डेटा-आधारित परिसंस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाने महाकृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ जाहीर केले आहे. हे धोरण कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये ‘एआय’चा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महा एजीएक्स (महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंज), एआय-सक्षम ट्रेसिबिलिटी प्रणाली, एआय आधारित भू-स्थानिक बुद्धिमत्ता इंजिन, शेतकरी-केंद्रित एआय सल्ला मंच-महाविस्तार या डिजिटल पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक केंद्र म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यरत असून, शासनाने पहिल्या टप्प्यात रुपये 500 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.
एआय फॉर ॲग्री २०२६
एआय फॉर ॲग्री २०२६ कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित, समावेशक, हवामान-संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित कृषी परिवर्तनाला चालना देणारे हे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे. २२ व २३ फेब्रुवारी २०२६ रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे ‘एआय ॲग्री २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये धोरणकर्ते, आंतरराष्ट्रीय संस्था,शास्त्रज्ञ, शैक्षणिक संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी उत्पादक संस्था तसेच शेतकरी समुदायाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ही परिषद डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम कृषी परिसंस्था निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. संयुक्त राष्ट्राने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केले आहे, त्यामुळे शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांच्यासाठीही या परिषदेमध्ये माहितीपूर्ण संवादसत्र आयोजित करण्यात येणार आहेत.
विविध चर्चासत्रांचे आयोजन
एआय फॉर ॲग्रीमध्ये दोन दिवस विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये कृषी व अन्न प्रणाली परिवर्तनासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान, महिला शेतकऱ्यांसाठी समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता : सक्षमीकरण, समता आणि नेतृत्व, ॲग्री एआयसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा : डेटा, विश्वास, ट्रेसिबिलिटी आणि प्लॅटफॉर्म्स, ॲग्री एआय मधील गुंतवणूक : बाजारपेठा आणि विस्तारक्षम नवोन्मेष, जागतिक वैज्ञानिक सहकार्य आणि एआय फॉर ॲग्री संशोधन नेटवर्क, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, धोरणात्मक मार्ग आणि जागतिक प्रशासन याविषयांचा समावेश आहे.
कृषी क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांचा परिषदेत सहभाग
‘एआय फॉर ॲग्री’ ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक, इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रापीक्स, भारतीय विज्ञान संस्था, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये नामांकित शैक्षणिक संस्था, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, स्टार्टअप्स तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सशक्त जाळे सहभागी होणार आहे. या परिषदेत इन्फोसिसचे अध्यक्ष व सह-संस्थापक तसेच युआयडीआय (आधार) चे संस्थापक अध्यक्ष नंदन निलेकणी, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या स्वामिनाथन, C4IR इंडियाचे मुख्य सल्लागार जे. सत्यनारायण, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम; केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होणार असून त्यात प्रामुख्याने बहुपक्षीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र, नामांकित अशासकीय संस्था, उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
शेतकरी व शेतकरी उत्पादक संस्थांसाठी फायदेशीर
एआय फॉर ॲग्री ही परिषद शेतकरी-केंद्रित परिणामांवर विशेष भर देऊन आखण्यात आली असून, तांत्रिक नवोन्मेषांचा प्रत्यक्ष लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्याचा उद्देश आहे. या परिषदेमुळे शेतकरी व शेतकरी उत्पादक संघटनांना एआय-आधारित पीक सल्ला सेवा, हवामान-लवचिक शेती नियोजन साधने, कीड व रोगांबाबत पूर्वसूचना प्रणाली, उत्पादन अंदाज, बाजारपेठेची माहिती तसेच ट्रेसिबिलिटी-सक्षम मूल्यसाखळ्या यांवरील उपाय योजनांचा प्रत्यक्ष अनुभूती व माहिती मिळणार आहे.
कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित कृषी प्रदर्शन
एआय फॉर ॲग्री २०२६ अंतर्गत ३० अग्रगण्य स्टार्टअप्सचे प्रदर्शन, तसेच उद्योग व शैक्षणिक संस्थांचा सहभाग आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये कृषी मूल्यसाखळीतील विविध टप्प्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अत्याधुनिक नवोन्मेषी उपाययोजना सादर केल्या जातील. यामध्ये प्रिसिजन शेती, रिमोट सेन्सिंग व भू-स्थानिक बुद्धिमत्ता, एआय-आधारित सल्ला प्रणाली, हवामान जोखीम विश्लेषण, ट्रेसिबिलिटी, डिजिटल अॅग्री-फायनान्स तसेच बाजार संलग्नता यांसारख्या क्षेत्रांतील उपायांचा समावेश असेल.
मुख्य कार्यक्रम, उद्घाटन व राष्ट्रीय स्तरावरील समन्वय
एआय फॉर ॲग्री परिषदेमध्ये २२ व २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष सीईओ राउंडटेबल बैठक, महाॲगएक्स-महाराष्ट्र कृषी डेटा एक्सचेंजचे उद्घाटन, एआय फॉर आरएन संशोधन नेटवर्कचा शुभारंभ, अॅग्रीटेक स्टार्टअप्ससाठी गुंतवणूक मंच, दोन दिवसीय एआय फॉर ॲग्री नवोन्मेष प्रदर्शन, भिली आदिवासी भाषेसाठी विकसित केलेल्या एलएलएमचे उद्घाटन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण सामंजस्य करार यांचा समावेश आहे. एआय फॉर ॲग्री ही परिषद इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ ची अधिकृत सॅटेलाईट इव्हेंट म्हणून घोषित करण्यात आली असून, त्यामुळे या परिषदेमधील निष्कर्ष, शिफारसी व उपक्रमांना राष्ट्रीय पातळीवरील एआय उपक्रमांशी सुसंगती प्राप्त होणार आहे. यामुळे भारताच्या व्यापक एआय धोरणात्मक चर्चेत व नवोन्मेष परिसंस्थेत या परिषदेतून उद्भवणारे निष्कर्ष मोलाची भर घालतील.