लोणावळा (पुणे) : लोणावळ्यामध्ये आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी घडली आहे. पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास असलेल्या आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय विरेंद्र सिन्हा यांनी लोणावळ्यातील लायन्स (टायगर) पॉईंट परिसरात दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाणेर (पुणे) येथे राहणारे विरेंद्र सिन्हा यांनी लायन्स पॉईंट परिसरात हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास लायन्स पॉईंट येथे त्यांची चारचाकी संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे आढळले. याच दरम्यान त्यांनी मित्र तसेच पत्नीला संदेश आणि ई-मेलद्वारे गंभीर इशारा दिल्याचे समजते. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली.ज्या ठिकाणी वाहन पार्क केले होते, त्याच्यासमोरील सुमारे २०० ते २५० फूट खोल दरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने सायंकाळी मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. १२ फेब्रुवारी हा त्यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याचे सांगितले जाते. मध्यरात्रीपासून त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र क्रमांक ब्लॉक असल्याने संवाद होऊ शकला नाही, अशी माहिती पुढे येत आहे. त्यानंतर संदेश पाठवून त्यांनी दरीत उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेमुळे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.