मुंबई : शहरातील मुलुंड (पश्चिम) परिसरात शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामस्थळी गंभीर दुर्घटना घडली. लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान पिलरचा सिमेंटचा एक मोठा तुकडा अचानक खाली पडला. हा स्लॅब रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळल्याने मोठी हानी झाली.ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ दुपारी सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा, अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रिक्षाचालकाचे पाय स्लॅबखाली अडकले होते. बचाव पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर स्लॅब हटवून त्यांची सुटका केली. त्यांना उपचारासाठी उपासनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचा पुढील भाग पूर्णपणे चेंगरला गेला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्लॅब कोसळल्यावेळी रस्त्यावर वाहतूक सुरू होती. बांधकामस्थळी पुरेशी सुरक्षितता उपाययोजना आणि बॅरिकेटिंग नसल्याचीही चर्चा स्थानिकांकडून होत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या खांबाचा काही भाग बांधकामादरम्यान तुटून खाली पडला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली. पुढील चौकशी सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गिकेचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. या घटनेनंतर मेट्रो प्रकल्पातील सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.