उरण : नवी मुंबईमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येबाबत व्यसनमुक्ती च्या क्षेत्रात मार्गदर्शकाचे,गाईडचे काम करणारे दर्शन नाईक यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिवसेंदिवस विविध व्यसनाचे प्रमाण नवी मुंबई क्षेत्रात वाढत असून हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून विविध व्यसनामूळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. व्यसना पासून तरुणांनी नागरिकांनी दूर राहावे यासाठी गेली अनेक वर्षे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असणारे उरण मधील दर्शन नाईक यांनी आजपर्यंत अनेक विविध भागात जाऊन, जनतेला मार्गदर्शन करून समाज प्रबोधन केले आहे. व्यसना पासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत.पोलिसांच्या सहकार्याने वेगवेगळ्या उपाययोजना राबवून जनजागृती करणार असल्याचे दर्शन नाईक यांनी सांगितले.
या बाबतीत दर्शन नाईक यांनी ACP रामचंद्र मोहिते (ANTF), पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गवशेते तसेच अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यसनाच्या बाबतीत असलेल्या विविध समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.यावेळी नवी मुंबईमध्ये वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येबाबत, विशेषतः तरुण वर्ग आणि शाळा-कॉलेज स्तरावर, याबाबत सखोल आणि अर्थपूर्ण चर्चा झाली.व्यसनमुक्ती या विषयावर सामाजिक स्वयंसेवक आणि समुदाय उपक्रमांसोबत एकत्रितपणे काम करण्याची तयारी पोलीस प्रशासन विभागाने दर्शवली आहे याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. येत्या काळात ANTF टीमसोबत मिळून जागृती मोहिमा, शाळा स्तरावरील कार्यक्रम आणि समुदाय जनजागृती उपक्रम राबवण्याचे आम्ही निश्चित केले आहे.आपल्या समाजाचे रक्षण करणे आणि पुढील पिढीला योग्य दिशादर्शन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.जागरूकता, शिक्षण आणि योग्य वेळी सहाय्य यांच्या माध्यमातून आपण नवी मुंबईला अधिक सुरक्षित आणि अमली पदार्थमुक्त शहर बनवू शकतो.असे मत दर्शन नाईक यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले.