पिंपरी-चिंचवड : बाबूरावजी घोलप महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी येथे ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. क्रांती बोरावके यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. देवकी राठोड यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी, महसूल व खर्चाची रचना, कृषी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, करप्रणाली आदी घटकांवर सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता जगताप होत्या. त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा केवळ अभ्यास न करता त्याचा समाज, शेतकरी व युवकांवर होणारा परिणाम समजून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.या कार्यशाळेत ४० विद्यार्थ्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध घटकांवर PPT सादरीकरणाद्वारे विश्लेषण सादर केले. या सादरीकरणांचे मूल्यमापन प्रा. सागर कांबळे व प्रा. विक्रम मालतुमकर यांनी परीक्षक म्हणून केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक करून सुधारणा सूचनाही दिल्या.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. रोहिणी येवले यांनी संपूर्ण आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दिपाली चिंचवडे यांनी केले.या कार्यशाळेस डॉ. विशाल पावसे, डॉ. रमाकांत कस्पटे, डॉ. मनीषा खैरे, प्रा. राजेंद्र भोईवार, डॉ. दत्तात्रय फटांगडे, प्रा. अक्षय कामठे, प्रा. अथर्व गायकवाड तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना देशाच्या आर्थिक धोरणांची प्रत्यक्ष माहिती मिळाली असून अर्थसंकल्प समजून घेण्याची दृष्टी विकसित झाली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.