सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 विश्लेषण

अजित पवार विमान दुर्घटना : दोन्ही रेकॉर्डर बाधित, L3 संभाषण डेटा सुरक्षित; तपासाबाबत पहिलं अधिकृत निवेदन

डिजिटल पुणे    17-02-2026 13:17:44

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने दिलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानातील दोन्ही रेकॉर्डर आगीत बराच वेळ राहिल्याने त्यांना गंभीर हानी पोहोचली आहे. मात्र L3 संभाषणाशी संबंधित काही डेटा यशस्वीरीत्या प्राप्त करण्यात तपास यंत्रणेला यश आले आहे.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची सखोल तपासणी सुरू

ब्युरोच्या माहितीनुसार, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) हा Honeywell कंपनीनिर्मित असून त्यावरील तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. आवश्यक असल्यास संबंधित देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत घेण्यात येत आहे. अपघाताबाबत तर्क-वितर्क टाळून तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहनही AAIB ने केले आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार पुराव्यांवर आधारित तपास सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

विमान अपघातानंतर सर्वप्रथम शोध घेतला जातो तो ‘ब्लॅक बॉक्स’चा. यात फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश असतो. उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण, तांत्रिक मापदंड आणि उड्डाणाशी संबंधित महत्त्वाची माहिती यात नोंदवली जाते. प्रत्यक्षात त्याचा रंग नारंगी असतो, जेणेकरून तो शोधणे सोपे जाईल. उच्च तापमान, पाण्यात बुडणे अशा प्रतिकूल परिस्थितीतही डेटा सुरक्षित राहावा यासाठी त्याची रचना विशेष पद्धतीने केलेली असते.

ब्लॅक बॉक्सचा शोध कोण घेतं?

विमान अपघातानंतर विशेष प्रशिक्षित तपास पथक घटनास्थळी पाठवले जाते. Directorate General of Civil Aviation (DGCA) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया राबवली जाते. आवश्यकतेनुसार नौदल किंवा इतर बचाव पथकांचीही मदत घेतली जाते.

रोहित पवारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तपासाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अपघाताला 20 दिवस उलटूनही तपासाला अपेक्षित वेग नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून उशीर तर होत नाही ना, असा सवाल करत त्यांनी पारदर्शक तपासाची मागणी केली. “अपघात की घात, याचे स्पष्ट उत्तर मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे.

दुर्घटनेची पार्श्वभूमी

28 जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी बारामती येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली आहे.तपासाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच दुर्घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार असून, अधिकृत निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती