मुंबई : हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुंबई क्लायमेट वीकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबईच्या महापौर रितू तावडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागाचे संचालक मार्टिन क्रुसे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबईसारख्या किनारी महानगराला हवामान बदलाचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, घरे पाण्याखाली जाणे, व्यवसाय ठप्प होणे आणि उपजीविकेवर परिणाम होणे ही परिस्थिती वारंवार दिसत आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम बांधकाम कामगार, फेरीवाले आणि शेतकरी यांच्यावर होत आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे कापणी केलेली पिके नष्ट होतात, ज्याचा मोठा आर्थिक व सामाजिक परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली असून स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. महाराष्ट्रही या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा क्षमता उभारण्यात आली असून 2030 पर्यंत हरित ऊर्जेचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्वच्छ हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक, जैवइंधन आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हवामान कृतीकडे केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक, नवकल्पना आणि रोजगारनिर्मितीची मोठी संधी मानतो. जागतिक भांडवल शाश्वत बाजारपेठांकडे वळत असून कमी कार्बन तंत्रज्ञानामुळे स्वच्छ उपाय अधिक परवडणारे होत आहेत. जे राज्य वेगाने बदल स्वीकारतील, ते भांडवल आणि कौशल्य आकर्षित करतील. महाराष्ट्र या परिवर्तनाचे नेतृत्व करेल.
राज्यात औद्योगिक क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, शहरांमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देणे, सार्वजनिक वाहतूक व लॉजिस्टिक प्रणाली अधिक पर्यावरणपूरक करणे यावर भर दिला जात आहे. पूरनियंत्रण व्यवस्था, हवामान स्मार्ट नागरी नियोजन आणि डेटा आधारित अंदाज प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये सुरुवातीपासूनच शाश्वतता आणि आपत्ती प्रतिकारक्षमता यांचा समावेश केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हवामान कृती ग्रामीण भागातही तितकीच महत्त्वाची असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, बदलत्या पावसाच्या पद्धती, पाण्याचा ताण आणि किनारी भागातील धोके लक्षात घेऊन हवामान प्रतिरोधक शेती, कार्यक्षम जलव्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित ग्रामीण मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर दिला जात आहे. हा बदल पुढील पिढ्यांसाठी आर्थिक संधी निर्माण करेल.हवामान बदलासाठी आवश्यक असलेली मोठी गुंतवणूक केवळ सार्वजनिक निधीतून शक्य नसल्याचे सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय वित्त संस्था आणि खासगी क्षेत्राला सहकार्याचे आवाहन केले. मिश्र वित्त, जोखीम-वाटप आणि नवतंत्रज्ञानासाठी भांडवल यांची गरज अधोरेखित करत मुंबई जागतिक हवामान वित्तासाठी प्रभावी केंद्र बनू शकते. हवामान न्याय ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची असून विकसनशील देशांना विकास आणि पर्यावरण यापैकी एकाची निवड करण्यास भाग पाडता कामा नये. योग्य भागीदारीतून दोन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, असे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
हवामान कृती ही घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ऊर्जा निर्मिती, प्रदूषण नियंत्रण, शहरांचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना मदत या सर्व बाबतीत ठोस कामगिरी आवश्यक आहे. मुंबई क्लायमेट वीक हा चर्चेचा मंच न राहता कृतीचा मंच ठरावा, गुंतवणूकयोग्य प्रकल्प आणि अंमलात येणाऱ्या भागीदाऱ्या निर्माण व्हाव्यात. हवामान कृती ही आपल्या पिढीची मोठी आर्थिक संधी ठरू शकते.
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राची कामगिरी प्रभावी, राज्याला आणखी १ लाख पंप देणार – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा व पीएम कुसुम योजनेमध्ये महाराष्ट्राने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. यामुळे पीएम कुसुम योजनेतील महाराष्ट्राच्या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्रसाठी आणखी एक लाख पंप मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केली.श्री. जोशी म्हणाले की, मुंबई क्लायमेट वीक हा हवामान विषयक चर्चा कृतीत रूपांतरित होत असल्याचे प्रतीक आहे. भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असतानाच उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे आणि आर्थिक वाढ व पर्यावरणीय जबाबदारी यांची सांगड घालण्याचे उदाहरण घालून देत आहे. महाराष्ट्राने लोकसहभागातून अक्षय ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असून लाखो घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसवले गेले आहेत. राज्याने सौरऊर्जा निर्मितीची मोठी उद्दिष्टे ठेवली असून ऊर्जा स्थैर्य आणि शाश्वततेसाठी तंत्रज्ञानाधारित उपाय शोधण्यावर भर दिला जात आहे. हवामान कृती लोकचळवळ बनल्यास परिवर्तन अधिक वेगाने घडते.
पीएम कुसुम आणि छतावरील सौरऊर्जा योजनांमुळे शेतकरी व नागरिक स्वतः ऊर्जा निर्मिती करून खर्चात बचत करत असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षय ऊर्जेची क्षमता गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर वाढली असून सौर आणि पवन ऊर्जेचा विस्तार वेगाने होत आहे. ऊर्जा साठवणूक, ग्रीड स्थैर्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मागणी पुरवठा व्यवस्थापनावर काम सुरू आहे. हरित हायड्रोजन आणि हरित अमोनिया क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर कमी खर्चाचे नवे मानदंड प्रस्थापित केले आहेत, ज्यामुळे उद्योग आणि शेती क्षेत्राला चालना मिळेल. भारत विकास आणि उत्सर्जन यांचे विभक्तीकरण साध्य करत जागतिक स्तरावर आदर्श निर्माण करत असून मुंबईने जागतिक दक्षिणेचा आवाज बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हवामान कृतीसाठी युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा – पंकजा मुंडे
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हवामान कृतीसाठी शासन, शहर संस्था आणि नागरिक यांची भागीदारी आवश्यक असून युवकांचा सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. समुदाय जनजागृती, हवामान साक्षरता आणि युवक उपक्रमांद्वारे शाश्वत महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध देशांतील प्रतिनिधी या मंचावर एकत्र येत असून, जागतिक सहकार्य आणि व्यवहार्य भागीदारीतूनच हवामान कृती यशस्वी होईल. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
“संपूर्ण जग एक कुटुंब आहे” ही आपल्या संस्कृतीची भावना हवामान कृती ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करते. एका प्रदेशावर होणारा परिणाम अखेरीस सर्वांवर होतो. महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसमोर उभे असलेले हवामान आव्हान गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. वाढते शहरी तापमान, अतिवृष्टी, पूरस्थिती, किनारपट्टीवरील ताण आणि वायू गुणवत्तेवरील दबाव या गंभीर बाबी आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातही अनपेक्षित दुष्काळ व पूर यांचा फटका बसत असून या पार्श्वभूमीवर मुंबई क्लायमेट वीकची संकल्पना हा उपक्रम केवळ चर्चेसाठी नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वित्तपुरवठ्याच्या मार्गांना चालना देण्यासाठी आहे. सर्वांनी या मंचातील चर्चांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून व्यवहार्य उपाय सुचवावेत, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.
महाराष्ट्र औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि विकासाच्या आघाडीवर असताना हवामान संवेदनशील विकासाची दिशा स्वीकारत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले. ऊर्जा, नागरी विकास, पाणी आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून कृतीप्रधान धोरण राबवले जात आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये अक्षय ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमतेचा विस्तार, शहर नियोजनात हवामान जोखमींचा समावेश आणि विभागनिहाय शाश्वत नियोजन यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी यांनी प्रास्ताविकात मुंबई क्लायमेट वीकची गरज व त्यानिमित्ताने या उपक्रमात होणाऱ्या चर्चेची माहिती दिली.यावेळी मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल विषयक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सी ४० सिटीज क्लायमेट लिडरशिप ग्रुप यांच्यातही हवामान बदल व शहरी उपाय योजना बळकट करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.