सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

रेगे स्मृतिदिनी ‘छांदसी’त काव्यरसाची वृष्टी

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    18-02-2026 10:51:56

उरण : रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १७ फेब्रुवारी रोजी मराठीतील श्रेष्ठ कवी पु. शि. रेगे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थीकवी-कवयित्रींच्या कविसंमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा उरण यांच्या सहकार्याने मराठी विभाग व ग्रंथालय विभागाने संयुक्तपणे भरविलेल्या या कविसंमेलनाला ‘छांदसी’ हे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात ग्रंथालय विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली.


प्रास्ताविकात प्रा. गजानन चव्हाण यांनी ‘छांदसी’ हे शीर्षक निवडण्यामागील औचित्य स्पष्ट केले. त्यांनी पु. शि. रेगे यांचा ‘छांदसी’ हा समीक्षा-लेखसंग्रह मराठी साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असून त्यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत या काव्यसंमेलनाला तेच नाव देण्यात आल्याची माहिती दिली. रेगे यांच्या काव्यदृष्टि व समीक्षेच्या परंपरेत त्यांचे मोलाचे योगदान विद्यार्थ्यांसमोर त्यांनी प्रभावीपणे उलगडले.
कविसंमेलनात काव्यवाचक म्हणून गजआनन म्हात्रे, राम म्हात्रे, श्रीमती अपेक्षा गोसावी आणि  शिवप्रसाद पंडित यांनी विविध विषयांवरील रचना सादर केल्या. विद्यार्थीकवयित्रींमध्ये कु. समिधा रेवसकर, कु. माही भोईर, कु. हर्षदा महांकाळ आणि दौलत पाटील यांनी तरुणाईची स्वप्ने, जगण्यातील संघर्ष आणि निसर्गाशी असलेले भावबंध व्यक्त करणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी सर्व कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन केले.


विशेष निमंत्रित कवयित्री ऋतुजा म्हात्रे यांनी ‘चाफा’ या त्यांच्या आगामी काव्यसंग्रहातील तीन निवडक कविता सादर करताना ग्रामीण स्त्रीमन, ऋतुचक्र आणि घरगुती नात्यांतील नाजूक भावविश्व प्रभावीपणे उभे केले. कवयित्री स्वाती गोडे बांगर यांनी स्त्रीदास्य, परंपरा व आधुनिक संस्कृती यांतील ताणतणावांवर भाष्य करणाऱ्या, स्त्रीस्वातंत्र्याच्या जाणिवा अधोरेखित करणाऱ्या कविता सादर केल्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील होते. त्यांनी प्रत्येक कवीच्या काव्यवाचनातील भाषा, आशय आणि लय यांतील वैशिष्ट्यांवर मार्गदर्शनपर भाष्य केले आणि शेवटी स्वतःची आगरी बोलीतील ‘इवान’ ही कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांच्या हस्ते सर्व निमंत्रित मान्यवरांचा स्मृतिचिन्हे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राम गोसावी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. बळीराम पवार आणि मराठी विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली.आभार प्रदर्शन संयोजक प्रा. डॉ. चिंतामण धिंदळे यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवर, कवी, विद्यार्थी, कोकण मराठी साहित्य परिषद आणि महाविद्यालयीन विभागांचे आभार मानले. पु. शि. रेगे यांच्या स्मरणार्थ आयोजित अशा काव्यसंमेलनांमधून नव्या पिढीतील कवी-कवयित्री घडत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 Give Feedback



 जाहिराती