सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 राजकारण

काकांच्या विमान अपघाताचा छडा लावण्याचा ध्यास; रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनी आणि ट्रोलर्सवर गंभीर आरोप

डिजिटल पुणे    18-02-2026 17:03:30

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच सोशल मीडियावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सनाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

रोहित पवार म्हणाले, “माझ्या काकांच्या अपघातामागचे सत्य शोधण्याचा मला ध्यास लागला आहे. काही जण मला वेड लागल्याचा प्रचार करत आहेत. पण हे वेड काकांवरील प्रेमामुळे आहे. महाराष्ट्रातील जनतेलाही सत्य जाणून घ्यायचे आहे.” त्यांनी भाजपशी संबंधित काही ट्रोलर्सवर पैशासाठी काम करत असल्याचा आरोप करत, “आमच्यासोबत स्वाभिमानी मराठी जनता आहे,” असे ठामपणे सांगितले.

पायलट आणि कंपनीवर गंभीर आरोप

या प्रकरणात संबंधित विमान कंपनी व्हीएसआरवरही त्यांनी थेट आरोप केले. मुख्य पायलट सुमित कपूर याच्याविषयी गंभीर शंका उपस्थित करत, तो पूर्वी निलंबित होता आणि त्याच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते, असे ते म्हणाले. तसेच कंपनीतील काही अधिकाऱ्यांबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला.रोहित पवार यांनी असा दावा केला की, काही वैमानिकांकडे वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालवण्यासाठी आवश्यक परवाने नसतानाही ते उड्डाण करत होते. लेगेसी आणि लिएर जेट या भिन्न प्रकारच्या विमानांसाठी स्वतंत्र परवाने आवश्यक असतात, मात्र संबंधितांकडे त्याबाबत योग्य कागदपत्रे होती का, असा सवाल त्यांनी केला.

केंद्रीय मंत्र्यावरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्याविषयीही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. संबंधित विमान कंपनीच्या मालकाशी त्यांचे वैयक्तिक संबंध असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

“सत्य बाहेर येणारच”

“कितीही ट्रोलिंग झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. अजितदादांच्या अपघातामागील सत्य बाहेर येईपर्यंत लढा सुरू राहील,” असा निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला.दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणांकडून यावर अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती