सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

जन्माला येऊन एकदा तरी रायगडावर या : भरत गोगावले

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    18-02-2026 17:53:28

 उरण  :"ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना विसरता कामा नये. तुम्ही देवधर्म सर्व काही करा, सगळीकडे फिरायला जा; परंतु जन्माला येऊन एकदा तरी रायगड किल्ल्यावर या. आपल्या राजासाठी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी! वासुदेव बळवंत फडके यांच्यामुळे देशभर शिरढोण गावाचे नाव आहे. ज्यांनी आहुती दिली, बलिदान दिले त्या शूरवीरांसमोर  नतमस्तक होणे आपले कर्तव्य आहे," असे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले म्हणाले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची १४३ वी पुण्यतिथी पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे मंगळवारी (ता. १७) साजरी करण्यात आली. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा धडा शालेय अभ्यासक्रमात यायला हवा, त्यांना शासकीय सलमी मिळायला हवी, वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार व्हायला हवे, त्यांच्या स्मृतिस्थळाचे नूतनीकरण व्हायला हवे, या शिरढोण ग्रामस्थांच्या मागण्या निश्चितच मी मंत्री या नात्याने पूर्ण करीन, परंतु ग्रामस्थांनी पाठपुरावा करावा. मी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.  
 
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष  महेंद्रशेठ घरत म्हणाले, "आम्ही एकेकाळी सगळे रायगड जिल्हा परिषद सदस्य होतो, पण मंत्री पदापर्यंत पोहोचण्याचा मान भरत गोगावले यांना मिळाला, आज ते फडके यांच्या पुण्यतिथीला आलेत, त्याबद्दल मला आनंद आहे. क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला कदापिही विसरून चालणार नाही, ते देशासाठी लढले म्हणून आपण आज आहोत, वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी-जयंती प्रत्येक ठिकाणी दिमाखात साजरी व्हायला हवी." 
 
यावेळी मनोहर भोईर म्हणाले, "शालेय शिक्षणात वासुदेव बळवंत फडके यांचा धडा हवा. क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली." उपमहापौर म्हणाल्या, "मी शिरढोणची कन्या आहे. माझ्या मागे खंबीरपणे माझे पती आहेत, त्यामुळेच मी पनवेलची उपमहापौर झाले. राजकारणात मी पाय रोवून आहे." यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर, रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, पनवेलच्या नवनिर्वाचित उपमहापौर प्रमिला पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण घरत, गटविकास अधिकारी समीर वाठारकर, पंचायत समिती सदस्य मनीषा पाटील, सरपंच वैशाली भोईर, उपसरपंच प्रियांका मुकादम, माजी सभापती दर्शना म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, दर्शना म्हात्रे आदींनीही आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिरढोण येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मुलांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. क्रांतिज्योत मित्र मंडळ, शिरढोण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य रामशेठ भोईर यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. रात्री शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने फडके यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती