सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

पत्रकारांच्या मुला - मुलींच्या करिअर साठी केलेल्या मदतीबद्दल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा बार्शीत पत्रकारांच्या वतीने सत्कार

डिजिटल पुणे    18-02-2026 18:20:33

बार्शी :  पत्रकारांच्या कल्याणासाठी भरीव योगदान देणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (दादा) पाटील यांचा बार्शी येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. पत्रकारांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या गरजांसाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल बार्शीतील पत्रकारांनी ग्रामदैवत भगवंताची मूर्ती भेट देऊन दादांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीचे संचालक तथा ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेत, मंत्री पाटील यांनी पत्रकारांसाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रेरणेने व आश्रयाने स्थापन झालेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत राज्यभरातील पत्रकारांना तब्बल १७ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. ही मदत पत्रकारांच्या मुलांच्या करिअर घडविण्यासाठी शैक्षणिक सहाय्य तसेच गंभीर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी देण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचे सामाजिक व वैयक्तिक आयुष्य सुदृढ राहणे अत्यावश्यक आहे, या जाणिवेतून दादांनी पुढाकार घेतल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके यांनी दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पत्रकारांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्परतेने मदतीचा हात देणे ही दुर्मीळ बाब आहे. आर्थिक मदतीसोबतच पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख अधिक दृढ झाली आहे. बार्शीतील या सत्कार सोहळ्याने पत्रकार बांधवांच्या एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा भाव अधोरेखित केला. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी उचललेले हे पाऊल राज्यातील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्कार प्रसंगी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, महिला जिल्हाध्यक्षा निता देव, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बसवंत तसेच संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि तालुक्यातील पत्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती