नाशिक : शहरातील सातपूर कॉलनी परिसरात अत्यंत वेदनादायी घटना घडली आहे. जीर्ण अवस्थेत असलेल्या घराची भिंत अचानक कोसळल्याने दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत बालकाचे नाव मोहम्मद उजेर खान असे आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सातपूर कॉलनीतील कामगार कल्याण मंडळाजवळील एका जुन्या घराची भिंत अचानक कोसळली. त्या वेळी जवळच खेळत असलेला उजेर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबला.
नागरिकांची तत्काळ मदत, तरीही जीव वाचला नाही
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन ढिगाऱ्याखालून बालकाला बाहेर काढले. त्याला तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांत नोंद, तपास सुरू
या प्रकरणाची नोंद सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर सातपूर कॉलनी परिसरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांच्या मते, परिसरात अनेक जुनी घरे व इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांची नियमित तपासणी होत नाही. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक बांधकामांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.