पुणे : शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून पुण्यात वादंग निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे २० फेब्रुवारी रोजी इरावती कर्वे सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमाला काही विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे.
विद्यार्थ्यांचा आक्षेप काय?
‘सकल विद्यार्थी समूहा’च्या वतीने विद्यापीठाच्या कुलगुरूंना सह्यांसह निवेदन सादर करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा सर्व समाजाचा उत्सव असून, त्याला राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित केल्यास कार्यक्रमाचे स्वरूप बदलू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, कार्यक्रमाबाबत संबंधित विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी आणि कार्यक्रमाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
समर्थनार्थही पत्र
दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी डॉ. कोल्हे यांच्या समर्थनार्थ स्वतंत्र निवेदन दिले आहे. दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अभ्यासू वक्त्यांना आमंत्रित करण्याची परंपरा विद्यापीठात आहे. शिवचरित्राचा सखोल अभ्यास असलेल्या व्यक्ती म्हणून अमोल कोल्हे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समर्थक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
अमोल कोल्हे यांची भूमिका
या वादावर प्रतिक्रिया देताना डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला असला तरी विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांना अधिकृत माहिती मिळालेली नाही. ठरलेल्या वेळेनुसार आपण व्याख्यानासाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत, राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपण अशा कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.या प्रकरणामुळे विद्यापीठातील वातावरण तापले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.