सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
  • अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा,मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार
 शहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला नैतिक अधिष्ठानाचा भक्कम आधार – खासदार डॉ. अमोल कोल्हे

डिजिटल पुणे    21-02-2026 10:40:51

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आणि त्यांच्या जीवनकार्याचा संपूर्ण पाया हा नैतिक अधिष्ठानावर आधारित होता, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय तांबट, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांच्यासह विविध विद्यापीठ अधिकार मंडळांचे पदाधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, शिवाजी महाराजांचे स्वराज्य केवळ राजकीय सत्तेचे प्रतीक नव्हते, तर ते लोककल्याण, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि नैतिक मूल्यांवर उभे असलेले लोकाभिमुख राज्य होते. सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणारी प्रशासन व्यवस्था उभी करून त्यांनी आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला. आजच्या काळातही शिवाजी महाराजांचे विचार व मूल्ये समाजासाठी मार्गदर्शक ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

एकतर्फी भाषण न करता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे व प्रेरणादायी विचारांच्या माध्यमातून त्यांनी महाराजांचे जीवन व कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यभावना व नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पर्यावरण व शेतकरीविषयक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण राज्यकारभारावर प्रकाश टाकला. महाराजांच्या आज्ञापत्रात “झाडाला लेकराप्रमाणे वाढवावे” असा उल्लेख असून, आंबा, फणस, काजू यांसारखी झाडे वाढण्यासाठी अनेक वर्षे लागतात, त्यामुळे ती तोडू नयेत, असा त्यांचा आदेश होता. यावरून महाराजांची पर्यावरणाबाबतची भूमिका केवळ संरक्षणापुरती मर्यादित नसून संवर्धनावर आधारित होती, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही” अशी आज्ञा देत महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आणि त्यांच्या कल्याणासाठी जिजियासारखा कर रद्द केला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराजांनी राज्यकारभार करताना स्वतःची क्षमता ओळखणे, कमकुवत बाजू समजून घेणे, स्पष्ट ध्येय निश्चित करणे आणि दूरदृष्टी ठेवणे ही सूत्रे वापरली. हीच तत्त्वे अंगीकारून युवकांनी जीवनात वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे यांनी केले. कुलसचिव तथा वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके यांनी आभार प्रदर्शन केले.


 Give Feedback



 जाहिराती