सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
  • अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा,मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार
 DIGITAL PUNE NEWS

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ‘कुंभदूत’ एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण ;सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग

डिजिटल पुणे    21-02-2026 11:00:53

नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६’मध्ये ‘कुंभदूत’ या एजेंटिक AI आधारित संकल्पनेचे सादरीकरण करण्यात आले. नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीस्कर मार्गदर्शन व सहाय्य मिळावे या उद्देशाने ही संकल्पना सादर करण्यात आली असून, पुढील काळात या प्रणालीचा टप्प्याटप्प्याने ‘कुंभदूत’ तंत्रज्ञानात उपयोग करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तंत्रज्ञान तज्ज्ञ उपस्थित होते.

ही संकल्पना “एजेंटिक कुंभ” या मॉडेलवर आधारित आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, सिंहस्थ २०२७ मध्ये नोंदणीकृत प्रत्येक भाविकाला एक वैयक्तिक एआय सहाय्यक मिळणार आहे. या सहाय्यकाचे नाव “कुंभदूत” असेल. हा कुंभदूत भाविकाला प्रवास, निवास, घाटांची माहिती, आपत्कालीन मदत, पेमेंट, भाषांतर आदी बाबतीत मार्गदर्शन करेल.

“एजेंटिक” म्हणजे काय?

एजेंटिक म्हणजे असा तंत्रज्ञानाधारित प्रणालीचा वापर, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा डिजिटल सहाय्यक (एआय एजंट) त्याच्या वतीने काम करतो. हा सहाय्यक शासन, आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था किंवा स्थानिक विक्रेते यांच्याशी समन्वय साधतो. मात्र, हे सर्व काम भाविकाच्या परवानगीने आणि गोपनीयता जपून केले जाते. कोणताही केंद्रीकृत डेटाबेस तयार केला जाणार नाही.

कुंभदूत एआय सहाय्यक २० पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये कार्य करू शकणार आहे. स्मार्टफोन असो वा साधा फीचर फोन, अगदी कॉल करूनही (IVR प्रणालीद्वारे) भाविक या सेवांचा लाभ घेऊ शकतील. डिजिटल साक्षरता नसलेल्या किंवा वयोवृद्ध भाविकांनाही सोप्या आवाजाच्या माध्यमातून माहिती मिळेल.

या प्रणालीमध्ये ‘कुंभ पास’ ही संकल्पना देखील प्रस्तावित आहे. हा पास ऐच्छिक असेल आणि तो डिजीलॉकरमध्ये सुरक्षित स्वरूपात ठेवला जाईल. यामुळे प्रवेश प्रक्रिया, सेवा मिळविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे अधिक सुलभ होईल.ही संपूर्ण यंत्रणा भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित असेल. यूपीआयद्वारे पेमेंट, आरोग्य नोंदीसाठी, व्यापाऱ्यांसाठी, तसेच डिजीलॉकर यांचा समन्वय या प्रणालीत असेल. मात्र, भाविकांची वैयक्तिक माहिती केंद्रीकृत स्वरूपात साठवली जाणार नाही. सर्व माहिती ही मर्यादित कालावधीसाठी आणि भाविकाच्या संमतीनेच वापरली जाईल.ही प्रणाली सिंहस्थ काळात १ कोटीपर्यंत भाविकांना आणि लाखो डिजिटल एजंट्सना हाताळण्यास सक्षम असेल. सिंहस्थ २०२७ पूर्वी नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये १०,००० सहभागींसह पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे .

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “सिंहस्थ २०२७ हे श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. एजेंटिक कुंभ ही संकल्पना महाराष्ट्राला जबाबदार आणि नैतिक एआय वापराच्या क्षेत्रात आघाडीवर नेईल.”नाशिक विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले, “सिंहस्थ हा जगातील सर्वात मोठ्या शांततापूर्ण धार्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. अशा विशाल सोहळ्याचे नियोजन करताना दूरदृष्टी आणि समन्वय आवश्यक असतो. एजेंटिक कुंभ संकल्पनेमुळे गोपनीयता जपत एकत्रित मागणी संकेतांच्या आधारे अधिक अचूक नियोजन करता येईल. यामुळे विविध विभागांमधील समन्वय आणि सेवा वितरण अधिक प्रभावी होईल. ही प्रणाली पारदर्शक आणि समतोल स्वरूपाची असून कोणत्याही कंपनीला विशेष लाभ देणारी नाही.”

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “एजेंटिक कुंभमुळे प्रत्येक भाविकाला वैयक्तिक सहाय्य मिळेल. भाषेची अडचण, माहितीचा अभाव किंवा गर्दीतील गोंधळ यामुळे भाविकांना होणारा त्रास कमी होईल. ही प्रणाली नियंत्रणासाठी नव्हे, तर समन्वयासाठी आहे.”

‘कुंभदूत’ एजेंटिक AI संकल्पनेची प्रमुख वैशिष्ट्ये

* प्रत्येक नोंदणीकृत भाविकासाठी वैयक्तिक एआय सहाय्यक

* २० पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आवाजावर आधारित सेवा

* स्मार्टफोन, फीचर फोन (कॉल) आणि किऑस्कद्वारे उपलब्धता

* ऐच्छिक ‘कुंभ पास’ – डिजीलॉकरमध्ये सुरक्षित साठवण

* यूपीआयद्वारे सोपी डिजिटल पेमेंट सुविधा

* प्रवास, निवास, घाट, आरोग्य व आपत्कालीन मदत मार्गदर्शन

* शासन विभाग, आरोग्य सेवा व व्यापाऱ्यांशी डिजिटल समन्वय

* गोपनीयता जपणारी, संमतीवर आधारित प्रणाली

* सिंहस्थपूर्व १०,००० जणांसह पायलट प्रकल्प


 Give Feedback



 जाहिराती