नागपूर : बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका वेळेआधीच व्हॉट्सअॅपवर प्रसारित झाल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका कोचिंग क्लासच्या संचालकासह एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून आणखी मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, निशिकांत मूल (वय ४५, मानकापूर) हा खासगी ट्युशन क्लास चालवणारा संचालक असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच फरहान अख्तर नावाच्या विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही बाब नागपूरमधील सेंट उर्सुला हायस्कूल परीक्षा केंद्रावर उघडकीस आली. रसायनशास्त्राचा पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत असल्याची माहिती पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आली. परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीने वारंवार प्रसाधनगृहात जाण्यामुळे संशय निर्माण झाला. तिची तपासणी केल्यानंतर तिच्याकडे मोबाईल आढळला. त्या मोबाईलमधील तपासात सकाळी १०.३७ वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरे ‘XII’ नावाच्या २१ सदस्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर झाल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयांचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे तासाभर आधीच प्रसारित झाल्याची पुष्टी झाली आहे. संबंधित क्रमांक निशिकांत मूल याच्याशी जोडलेला असल्याचे समोर आले आहे. प्रकरण उघड होताच संबंधित मोबाईल क्रमांक बंद करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर पडली, यात आणखी कोण सहभागी आहे आणि किती विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचला, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.